लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लसीकरणासोबतच त्यांची आरोग्य तपासणी व्हावी, यासाठी सुरू असलेल्या उपक्रमात उद्दिष्टाच्या २० टक्केच काम झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आरोग्यविषयक जनजागृतीबाबतही नागरिकांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे.जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयात मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिर व लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या शिबिरांमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी आणि विशेष लसीकरण केले जात आहे. व्यापक जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय काम करीत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ यांच्याद्वारे तपासणी करून औषधोपचार केला जात आहे. बालके लसीकरणापासून सुटलेली आहेत, त्यांचे लसीकरण प्राधान्याने होत आहे. त्यांची संख्या निश्चित असताना त्या लसीकरणासाठी नागरिकांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे. शहरी भागातील अनेक पालक लसीकरणाला नकार देत आहेत. त्यामुळे ठरलेले उद्दिष्ट गाठणेही आरोग्य यंत्रणेला कठीण झाले आहे. बाळापूर शहरात तर पालकांनी लसीकरणाला चक्क नकार दिल्याची माहिती आहे.
लसीकरणास अकोला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:59 IST