कोरोनाच्या संकटातही दुकानदारी; मनपाने ठोठावला ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:20 AM2020-05-26T10:20:51+5:302020-05-26T10:20:59+5:30

गणेश स्वीट मार्ट सुरू असल्याचे दिसताच सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित व्यावसायिकाला ५० हजारांचा दंड ठोठावला.

 Shoplifting in the corona crisis; Municipal corporation slapped a fine of Rs 50,000 | कोरोनाच्या संकटातही दुकानदारी; मनपाने ठोठावला ५० हजारांचा दंड

कोरोनाच्या संकटातही दुकानदारी; मनपाने ठोठावला ५० हजारांचा दंड

Next

अकोला: कोरोना विषाणूच्या संकटकाळात शहरांमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याला मुभा असताना महापालिकेच्या परवानगीशिवाय जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्ट सुरू असल्याचे दिसताच सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित व्यावसायिकाला ५० हजारांचा दंड ठोठावला.
संसर्गजन्य कोरोना विषाणूने महापालिका क्षेत्रात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली आहे. या दरम्यान नागरिकांची गैरसोय टाळावी या उद्देशातून जीवनावश्यक वस्तूंची निश्चित कालावधीमध्ये विक्री करण्याला परवानगी देण्यात आली आहे. असे असतानासुद्धा जठारपेठ चौकात गणेश स्वीट मार्ट या दुकानातून खाद्यपदार्थांची मोठ्या धडाक्यात विक्री सुरू असल्याचा प्रकार सोमवारी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आला. या प्रकाराची दखल घेत मनपा आयुक्त कापडणीस यांनी संबंधित व्यावसायिकाला ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई केली. यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, आरोग्य निरीक्षक शैलेश पवार व अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


दंड कमी करण्यासाठी प्रशासनावर दबावतंत्र
मनपा प्रशासनाने संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्याला ५० हजार रुपयांचा दंड आकारल्यानंतर शहरातील काही राजकारण्यांकडून ही दंडाची रक्कम कमी करण्यात यावी यासाठी महापालिकेवर दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. एकीकडे अकोलेकरांना कोरोना संदर्भात जनजागृतीद्वारे आवाहन करणारे राजकारणी दुसरीकडे कोरोनाच्या संकटातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या पाठीशी असल्याची खमंग चर्चा शहरात रंगली आहे.

कोरोनाची धास्ती; तरीही नाश्त्यासाठी गर्दी
शहरामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी ४०० चा आकडा ओलांडला आहे. शहराच्या प्रत्येक भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरीही या बाबीचे गांभीर्य नसल्यामुळे की काय, या ठिकाणी नागरिकांनी नाश्ता करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

Web Title:  Shoplifting in the corona crisis; Municipal corporation slapped a fine of Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.