बाळापूर : बाळापूर शहरातील १८ वर्षीय युवतीसोबत सातरगाव येथील २४ वर्षीय युवकाने प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिचे लैंगिक शोषण केले. युवकाविरूद्ध बाळापूर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केल्यामुळे घाबरलेल्या युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला सर्वोपचार रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.१८ वर्षीय युवतीचे सातरगावच्या युवकासोबत सुत जुळले. युवतीने वयाची १८ वर्ष पूर्ण केली नसल्याने लग्नाला अडचण येत होती. त्यानंतरही युवक-युवती लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. युवतीने १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रियकर आकाश तुळशीराम सुर्वे याच्याकडे लग्न करण्याची गळ घातली आणि येत्या आठ दिवसात लग्न करण्यास म्हटले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. युवकाने तो मी नव्हेच अशी भुमिका घेतली आणि तिचे अश्लील फोटो फेसबुक, सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे युवतीने बाळापूर पोलिसांकडे धाव घेत, त्याच्याविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीनुसार आकाश सुर्वे याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६(२),(एन), ५0६, ४/८ पोस्कोनुसार गुन्हा दाखल केला. आपल्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच, आकाश सुर्वे याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारार्थ सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळापूर पोलीस पुढील तपास करीत आहे.
युवतीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल झाल्यामुळे युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:01 IST