खामगाव(जि. बुलडाणा), दि. २९ : क्रिकेट खेळण्याच्या वादातून २३ वर्षीय युवकाचा खून करणार्या आरोपीस सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी सुनावली. हा निकाल खामगाव न्यायालयाने सोमवारी दिला. फाटकपुरा भागातील इम्रान बेग रूस्तम बेग (वय ३३) व सय्यद अजीम सय्यद अजीज (वय १९) हे १९ मे २0१0 रोजी शाळा नं.२ मध्ये सकाळी ७ वाजताच्या सुमारास क्रिकेट खेळत असताना या दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास इम्रान बेग व त्याचा भाऊ सुफियान बेग हे मस्तान चौकातील मशीदमध्ये नमाज पठणासाठी गेले होते. नमाज अदा केल्यानंतर दोघे भाऊ बाहेर आले असता, सय्यद अजीम हा ऑटोत बसून त्यांची वाट पाहत होता. इम्रान येताच सय्यद अजीमने त्याच्या डोक्याच्या पाठीमागे लोखंडी पाइपने मारहाण केली. मारहाणीत इम्रान हा तोंडावर जमिनीवर कोसळला व गंभीर जखमी झाला. त्याचा भाऊ सुफीयान बेग रूस्तम बेग याने शिवाजी नगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी स.अजीम स.अजीज विरुद्ध कलम ३२४ चा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या इम्रानचा उपचारादरम्यान २५ मे २0१0 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी स.अजीज विरुद्ध कलम ३0२ खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सोमवारी खामगाव न्यायालयात सुनावणी करण्यात आली. सरकारी पक्षाच्यावतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी तिघांची प्रत्यक्षदश्री साक्ष घेण्यात आली. या साक्षीवरुन आरोपी स.अजीम स.अजीज यास कलम ३0४ भाग २ भादंविनुसार सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे, असे निकालात नमूद आहे. याप्रकरणी सरकारी अभियोक्ता राजेश्वरी आळशी यांनी काम पाहिले.
खुनाच्या आरोपीस सात वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: August 30, 2016 01:29 IST