मृत्यूच्या दारातील मुलाला पाहताच हरपली पित्याची शुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:41 PM2019-08-09T13:41:52+5:302019-08-09T13:42:00+5:30

अकोला : राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन संपादनात योग्य व कायदेशीर मोबदला मिळावा, या मागणीसाठी सोमवार ५ आॅगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी ...

Seeing the child at the door of death father get brain hemorrhage | मृत्यूच्या दारातील मुलाला पाहताच हरपली पित्याची शुद्ध

मृत्यूच्या दारातील मुलाला पाहताच हरपली पित्याची शुद्ध

Next

अकोला : राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन संपादनात योग्य व कायदेशीर मोबदला मिळावा, या मागणीसाठी सोमवार ५ आॅगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आशिष यांना पाहण्यासाठी रुग्णालयात आलेले वडील मदन हिवरकर यांची शुद्धच हरपली. मदन हिवरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आशिषची प्रकृती गंभीर असल्याने या प्रकरणाची वाच्यता झाली नव्हती; पण गुरुवारी त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज न घेता वडिलांसाठी खासगी रुग्णालयात धाव घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.
अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सोमवारी विष प्राशन केल्यानंतर सहाही शेतकºयांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये कान्हेरी गवळी येथील युवा शेतकरी आशिष हिवरकर यांनीही विष प्राशन केले होते. ही माहिती मिळताच त्याच दिवशी वडील मदन हिवरकर यांनी आपल्या एकुलत्या एक लेकाला पाहण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. मरणाच्या दारात असलेल्या मुलाला या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली अन् ते बेशुद्ध झाले. वडील मदन हिवरकर यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आला; परंतु या ठिकाणी डॉक्टरांचा संप आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने त्यांची प्रकृती गंभीर होत गेली. शेवटी त्यांना बुधवार, ७ आॅगस्ट रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. हा प्रकार आशिष यांना कळताच त्यांनी गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज न घेता वडिलांकडे धाव घेतली. आशिष यांच्यावरील उपचार अद्याप पूर्ण झालेला नाही; परंतु वडिलांची प्रकृती गंभीर असताना त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही. अशा परिस्थितीत दोन्ही बाप-लेकाच्या जीवास धोका निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.

मदन हिवरकर यांना ‘ब्रेन हॅम्रेज’
खासगी रुग्णालयात मदन हिवरकर यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहे. यासंदर्भात संबंधित रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला असता, मदन हिवरकर यांना ब्रेन हॅम्रेज झाल्याचे सांगितले. त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूने रक्तस्राव होत असून, हायपर टेन्शनमुळे हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.


आर्थिक परिस्थिती बेताची
हिवरकर कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. उपचारासाठी लागणारा पैसा जास्त असल्याने दोन्ही शेतकरी पिता-पुत्रावर मोठे संकट ओढवले आहे. वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसल्याने हक्कासाठी लढणारा आशिष हतबल झाला आहे; परंतु प्रशासनाकडून अद्याप कुठल्याच अधिकाºयाने पाहणी केली नसल्याचे आशिष यांनी सांगितले.

वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सोडून त्यांच्याजवळ आलो आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना माहिती दिली; परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही. कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने आतातरी हक्काचा मोबदला द्यावा.
- आशिष हिवरकर, महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी.

 

Web Title: Seeing the child at the door of death father get brain hemorrhage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.