बाळापूर : अकोल्यातील सर्वाधिक चर्चित मतदारसंघ म्हणून सध्या बाळापूरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात ४१ पैकी २५ उमेदवारांनी बुधवारी अखेरच्या दिवशी माघार घेतली. आता १६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये मान्यताप्राप्त पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार्या काही उमेदवारांनी माघार घेतली असली तरी दोन मातब्बर उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उभे ठाकल्यामुळे या मतदारसंघात सप्तरंगी लढत रंगणार आहे. बाळापूर मतदारसंघात काँग्रेसने माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, राष्ट्रवादीने हिदायत खाँ रुम खाँ, भाजपाने जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात तर शिवसेने कालीन लांडे यांना उमेदवारी दिली आहे. भारिप- बहुजन महासंघाने आमदार बळीराम सिरस्कार यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी माजी आमदार नारायण गव्हाणकर काँग्रेसशी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. तर शिवसंग्रामचे संदीप लोड यांनी भाजपाचे आवाहनाला न जुमानता अपक्ष म्हणून आपली उमदेवारी कायम ठेवली आहे. हे दोन्ही अपक्ष अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना दमदार लढत देण्याची शक्यता आहे. बाळापुरात जातीय समीकरणेदेखील प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. जातीय समिकरणाचा विचार केला, तर दोन प्रबळ उमेदवार मुस्लीम तर दोन अपक्ष मिळून चार उमेदवार मराठा समाजाची आहेत. एक उमेदवार माळी समाजाचा आहे. सर्वच उमेदवार आपणच विजयी होणार, हे सांगत असले तरी बाळापूरवासीयांना सप्तरंगी लढत पहावयास मिळणार हे निश्चित.
बाळापूरमध्ये सप्तरंगी लढत
By admin | Updated: October 3, 2014 01:35 IST