अकोला जिल्ह्यात संततधार; सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 10:46 AM2021-08-21T10:46:34+5:302021-08-21T10:46:47+5:30

आणखी चार दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Santadhar in the district; Rain continues for fourth day in a row | अकोला जिल्ह्यात संततधार; सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम!

अकोला जिल्ह्यात संततधार; सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम!

Next

अकोला : जिल्ह्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. विदर्भ व लगतच्या भागात चक्रवात तयार झाले आहे. मान्सूनच्या नोंदीने चढता आलेख गाठला आहे. गत तीन दिवसांपासून संततधार कोसळणारा पाऊस शुक्रवारीही ठाण मांडून बसून होता. या पावसामुळे काटेपुर्णा प्रकल्पातून विसर्ग सुरू झाला असून, आणखी चार दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील १५ - १८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजली होती. कपाशी, सोयाबीन व इतर पिकांवर किडींनी हल्ला चढविला होता. मंगळवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. गत चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी, नाले वाहू लागले आहेत. या पावसामुळे शेतातील कपाशी, तूर, सोयाबीन पिकातही पाणी साचू लागले आहे. शुक्रवारीही पावसाचा जोर कायम असून, दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यात मागील २४ तासांत ६.८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

चार दिवसांत ७० मिमी. पाऊस

जिल्ह्यात मंगळवारपासून सतत पाऊस बरसत आहे. ऑगस्ट महिन्यात सोमवारपर्यंत २२.७ मिमी पाऊस झाला होता. तर शुक्रवारी सकाळपर्यंत ९३.३ मिमी पाऊस बरसला. जिल्ह्यात गत चार दिवसांमध्ये ७०.६ मिमी पावसाची नोंद झाली.

 

ऑगस्टमधील तालुकानिहाय पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

अकोट             ७७.१

तेल्हारा             ७७.९

बाळापूर             ८४.०

पातूर             १५७.२

अकोला             ९०.५

बार्शीटाकळी ८४.८

मूर्तिजापूर             १००.४

 

काटेपुर्णा ९३, तर वान ६६ टक्के भरले!

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या काटेपुर्णा प्रकल्पात ९३.७५ टक्के, तर वान प्रकल्पात ६६.६४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. वान प्रकल्पाच्या क्षेत्रात सतत पाऊस सुरूच असल्याने पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. काटेपुर्णाची २ वक्रव्दारे ३० सेंमी उंचीने उघडली आहेत.

Web Title: Santadhar in the district; Rain continues for fourth day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.