अर्जुनकुमार आंधाळे / देऊळगावराजा : महाराष्ट्राच्या परंपरेतील विद्रोही संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून मागच्या काळात जन्मस्थळाचे चित्र का बदलु शकले नाही, याचा विचार न करता संत चोखोबांच्या या जन्मस्थळाचे नंदनवन करण्याचे ठाम आश्वासन देत साडेपाच कोटी रुपये विकासासाठी देण्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. यावेळी त्यांनी संत चोखोबांच्या नावाने सामाजिक कार्यासाठीच्या पुरस्काराची देखील घोषणा केली. गुरुवारी देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा नगरीत संत चोखोबांच्या ७४८ व्या जन्मोत्सव सोहळ्यात बडोले बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात जन्मस्थळाच्या विकासासाठी ५0 लाख रुपये तात्काळ देतो. तो निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा, त्यानंतर लगेच पुढील विकास कामासाठी पाच कोटीचा निधी देण्यात येईल असे सांगितले. देऊळगावराजा येथे मुलींचे वसतीगृह मंजूर करण्याचा शब्द देत संत चोखोबांच्या नावाने राज्यात उत्कृष्ट समाजसेवा करणार्या पाच व्यक्तींना पुरस्कार पुढील वर्षी याच जन्मोत्सव सोहळ्यात देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी चोखोबांचे स्मारक, उद्यान, पार्किंग व्यवस्थेसह भव्य सभामंडप कायमस्वरुपी पाणी व्यवस्थेसह शासकीय मुलींचे वसतीगृह देण्याची मागणी बडोले यांच्याकडे केली. जन्मोत्सव सोहळयाचे प्रवर्तक आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विकास आराखड्यासंदर्भात मत व्यक्त केले. तर खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय ग्रामविकास खात्याकडून तीन कोटी रुपये आणि पर्यटनाचा ह्यबह्ण दर्जा प्राप्त होताच अडीच कोटी रुपये देण्याची ग्वाही दिली. प्रास्ताविकात गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी सोहळा आयोजनाची माहिती दिली. संत चोखासागर (खडकपूर्णा) जलाशय नामकरणाचे शिल्पकार प्रा.कमलेश खिल्लारे यांनी संत चोखोबांचे जन्मस्थळ कायम उपेक्षित आहे. शासनाने दखल न घेतल्याची खंत व्यक्त करत शेगाव संस्थानच्या धर्तीवर या जन्मस्थळाचा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मेहुणाराजाला साडेपाच कोटींचा निधी
By admin | Updated: January 15, 2016 02:16 IST