अकोला: हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठातील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याने अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तसेच केंद्रीय मंत्र्यांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने सोमवारी वाशिम बायपास येथून निघालेला मोर्चा गांधी रोड मार्गे धिंग्रा चौक, अशोक वाटिका येथे पोहोचला. मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रोहितवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करीत केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय, मानवसंसाधन विकास मंत्री स्मृती इराणी तसेच हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अशोक वाटिका येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. यामध्ये मंत्र्यांवर कारवाईसोबतच ए.बी.व्ही.पी. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणीदेखील करण्यात आली. निवेदन देतेवेळी रिपाइं (ए) महानगराध्यक्ष गजानन कांबळे, फिरोज खान, वंदना वासनिक, उषाताई जंजाळ, युवराज भागवत, मनोज गमे, रोहित वानखडे, अजीज खान, मंदाताई निवाळे, वंदनाताई जाधव, अजाबराव तायडे, गौतम शेगोकार, विजय टोम्पे, संगीताताई गवई, कविता वानखडे, राहुल गवई, मंगला सिरसाट तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
रोहित वेमुला आत्महत्येच्या निषेधार्थ रिपाइं चा मोर्चा
By admin | Updated: January 26, 2016 02:25 IST