संतोष येलकर/अकोला : जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) ११ कोटी ८५ लाखांचा निधी उपलब्ध असूनही, जिल्हा परिषदेच्या कारभारात रस्ते कामांसाठी निविदा आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या रस्ते कामांचे घोडे जिल्हा परिषदेतच अडलेले आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अतवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली असून, रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामध्ये जिल्हा मार्ग आणि अंतर्गत जोड रस्त्यांचा समावेश असून, खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून वाहतुकीला कमालीचा अडथळा होत आहे. खड्डे शोधून वाहनधारकांना चालावे लागत असून, रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अनेकदा अपघाताच्या प्रसंगांनाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते समस्यांनी ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे करण्यासाठी सन २0१४-१५ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ह्यडीपीसीह्णमार्फत जिल्ह्यातील ६९ रस्ते कामांसाठी ११ कोटी ८५ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यात आला. निधी उपलब्ध असला तरी, जिल्हा परिषदेच्या कारभारात ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे अद्याप मार्गी लागली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करावयाच्या रस्ते कामांसाठी निविदा प्रक्रिया आणि कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे अडलेलीच आहेत.
ग्रामीण भागातील रस्ते कामांचे घोडे अडलेलेच
By admin | Updated: April 20, 2015 01:48 IST