अकोला - बाभूळगाव जहाँगीर येथील जवाहर नवोदय विद्यालयात ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणात संशयास्पद भूमिका बजावणारे प्राचार्य आर. टी. सिंह यांची बुधवारी दमण येथे बदली करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नवोदय विद्यालयातील आर. बी. गजभिये, शैलेश रामटेके व संदीप लाडखेडकर या तीन शिक्षकांनी विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ सुरू केला होता. प्रकरण सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर विद्यार्थिनींनी प्राचार्यांकडे तक्रारी केल्या. परंतु प्राचार्यांनी या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेतले नाही. राज्य महिला आयोगाच्या सदस्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी फौजदारी कारवाईचा आदेश दिला होता. त्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसात या शिक्षकांवर पॉस्को अँक्टसह विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या प्रकरणाची पहिली तक्रार २१ मार्च रोजी झाल्यानंतर प्राचार्यांनी १0 दिवस कारवाई न केल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. प्राचार्य सिंह यांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असल्याने त्यांच्यावर केवळ बदलीची कारवाई करण्यात आली असून, त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक संघटनांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. यासंदर्भात ,नवोदय विद्यालय प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त पी.व्ही.राजू यांनी नवोदय विद्यालय छळ प्रकरणात विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतरही कारवाई न केल्याने प्राचार्यांची बदली करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून, आणखी दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
प्राचार्यांची दमणला तडकाफडकी बदली
By admin | Updated: April 9, 2015 02:55 IST