कागदी, प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका
अकाेला : ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार कागदी, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या वापरावर बंदी असून असे ध्वज उत्पादन करणारे उत्पादक, विक्री करणारे विक्रेते, वितरक, मुद्रक यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अशा ध्वजांचा वापर थांबविण्यासाठी, नियंत्रण व जनजागृतीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
तसेच कार्यालये, प्रतिष्ठाने इ. ठिकाणी ध्वजारोहण करताना भारतीय ध्वजसंहितेत दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. वापरण्यास उपयुक्त नसलेले, फाटके, जीर्ण, माती लागलेले, रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पीक संरक्षणासाठी घंटा यंत्र; अर्ज मागविले
अकाेला : जंगली जनावरांपासून शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत घंटा यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून शुक्रवार २२ ते ३१ जानेवारी यादरम्यान अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यात अर्ज करावा. अर्जासोबत स्वतःच्या नावाचा मूळ सातबारा उतारा, आधार कार्ड, ओळखपत्र जोडावे. निवड झाल्यास लाभार्थ्याला १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर यंत्राचा दुरुपयोग न करण्याबाबत बंधपत्र लिहून तेही जोडावे लागेल. लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होईल, असे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अरविंद आगरकर यांचा सत्कार
अकाेला : काेल्हापूर ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने सद्भावना यात्रा काढणाऱ्या अरविंद आगरकर यांचा श्रद्धा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी मंगेश डावरे, केशवराव इंदाने, प्रतीक्षा अन्नदाते, प्रमिला म्हसाळकर, जया वाडेकर, तृप्ती नस्करी, मंजूषा जैन, कीर्ती संघवी, अलका उकलकर, गुणमाला फुरसुले, देवीका डावरे, मेघा डावरे, रिता कहाते आदी हजर हाेते.
संगीतमय रामचरित मानस नवान्ह पारायण
अकाेला : स्थानिक न्यू राधाकिसन प्लाॅट येथील सत्संग भवन येथे स्व. श्यामसुंदर जाजु स्मृतीनिमित्त संगीतमय रामचरित मानस नवान्ह पारायण पारायण सुरू आहे. या वेळी पंडित राधाकिसन महाराज हे रामचरित मानसचे पुष्प गुुंफत आहेत. या वेळी भाविकांची माेठ्या संख्येने उपस्थित राहत असून, काेराेना नियमांचे पालन करीत आहेत.
भाजप महिला आघाडीचे हळदीकुंकू
अकाेला : भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मंडळ महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयेाजित करण्यात आला हाेता. या वेळी महापाैर अर्चना मसने, महिला आघाडीच्या चंदा शर्मा, सुनीता अग्रवाल, गीतांजली शेगाेकार, अनिता चाैधरी, शकुंतला जाधव, रंजना पवार आदींसह शेकडाे महिलांची उपस्थिती हाेती. या वेळी महापाैर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.
सालासर बालाजी मंदिराकडून ७ लाख
अकाेला : अयाेध्येत श्रीराम मंदिर उभारण्याच्या निधी संकलनामध्ये स्थानिक सालासार बालाजी मंदिराकडून ७ लाख ५१ हजार रुपयांचे याेगदान देण्यात आले. या वेळी संघ प्रचारक रवींद्र जाेशी, आ. गाेवर्धन शर्मा, गाेपाल खंडेलवाल, प्रकाश साेनगावकर, जसवंत कावणाख, सुनील कुरेकर आदी उपस्थित हाेते. हा निधी समितीकडे सुपूर्द करण्यात आला.