जिल्ह्यात पावसाचा कहर; चार तालुक्यांत अतिवृष्टी, पिके पाण्याखाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:59+5:302021-07-23T04:12:59+5:30
घरांमध्ये घुसले पाणी, शेकडो घरांचे नुकसान अकोला : जिल्ह्यात बुधवारी रात्रभर बरसलेल्या पावसाने कहर केला असून, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, ...
घरांमध्ये घुसले पाणी, शेकडो घरांचे नुकसान
अकोला : जिल्ह्यात बुधवारी रात्रभर बरसलेल्या पावसाने कहर केला असून, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर व पातूर या चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली. मुसळधार बसरलेल्या पावसाने पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी संकटात सापडला आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील नदी, नाल्यांकाठच्या भागांत घरांमध्ये पुराचे पाणी साचल्याने, शेकडो घरांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत बुधवार, २१ जुलै रोजी रात्री मुसळधार पाऊस बरसला असून, जिल्ह्यातील चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील विविध भागांत शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे खरीप पिके पाण्याखाली गेली तसेच पुरामुळे नदी व नाल्यांकाठची शेतजमीन खरबडून गेली. पाऊस आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला. पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये शेकडो घरांची पडझड झाली असून नदी व नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.
‘या’ चार तालुक्यांत झाली अतिवृष्टी!
जिल्ह्यांतील अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर व पातूर या चार तालुक्यांत बुधवारी रात्री ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त म्हणजेच अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ११६.४ मि.मी., बार्शीटाकळी तालुक्यात १६८.६ मि.मी., बाळापूर तालुक्यात ८५.५ मि.मी. व पातूर तालुक्यात ६९.७ मि.मी. पाऊस झाला. तर, अकोट तालुक्यात ४३ मि.मी., तेल्हारा तालुक्यात ३१.३ मि.मी. व मूर्तिजापूर तालुक्यात ३८.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश!
पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतीपिके आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पाऊस आणि पुरामुळे घरांच्या नुकसानीसह पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना देण्यात आले आहेत.