Proposal of 1,000 crores for Maulana Azad Minority Corporation | मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळासाठी १ हजार कोटींचा प्रस्ताव
मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळासाठी १ हजार कोटींचा प्रस्ताव

अकोला: मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळासाठी शासनाकडे १ हजार कोटींची मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करीत राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आझम यांनी दिली.
स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आझम यांनी महामंडळाच्या कार्याची माहिती देत त्यांच्या कार्यकाळात महामंडळाच्या विविध योजनांमध्ये सुसूत्रता आणल्याचे स्पष्ट केले. सन २००० साली स्थापन झालेल्या या महामंडळासाठी शासनाने ५०० कोटींची तरतूद केली होती. गेल्या १८ वर्षात केवळ ३०० कोटी देण्यात आले असून, भाजपाच्या कार्यकाळात १२५ कोटीचा सर्वाधिक निधी देण्यात आला. अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे महामंडळ कार्यरत असून, विविध योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. महामंडळाची कार्यप्रणाली गतिमान झाली असून, उर्वरित ७५ कोटींचा निधीसुद्धा लवकरच प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. वाढती लोकसंख्या व लोकांची गरज लक्षात घेत महामंडळाला आणखी निधीची गरज असून, या महामंडळाला १ हजार कोटी देण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अहमद राणा, मोबीन सिद्दिकी, चांद खा आदी उपस्थित होते.

शैक्षणिक कर्ज वाटपात आघाडीवर
मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचा लाभ मुस्लीम, शीख, जैन, पारसी, ख्रिश्चन अशा धर्मातील बांधवांना मिळत असून, शैक्षणिक कर्ज वाटपामध्ये महामंडळ अग्रेसर असल्याचे आझाद यांनी सांगितले. राज्यभरात आतापर्यंत २८ कोटी ३६ लाख ७६ हजार ९०० रुपयांचे शैक्षणिक कर्ज वाटप केले असून, त्यामध्ये अकोल्यातील ५७, अमरावतीे १६, बुलडाणा ६७, वाशिम ९, यवतमाळच्या ४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 
लवकरच ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कर्ज
मौलाना महामंडळाने कर्ज वाटपात अनेक बदल केले असून, आता लवकरच वाहतूक व्यवसायासाठीही कर्ज वाटप केले जाणार असल्याचे आझाद यांनी सांगितले. सध्या व्यावसायिक कर्जाची असलेली मर्यादाही वाढविणार असल्याने त्याचा लाभ अनेकांना घेता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
 
मुस्लिमांना खूश करण्याचा प्रकार नाही
भाजपा सेनेची सत्ता आल्यानंतर चार वर्षानंतर आता मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाला अध्यक्षपद दिले हा मुस्लीम समाजाला खूश करण्याचा प्रकार आहे आहे का, असे विचारले असता यापूर्वी महामंडळाला अध्यक्षपद का दिले नाही, याचा विचार केल्यापेक्षा आता मिळालेल्या कार्यकाळात किती काम करता येईल, यावर माझा भर असल्याचे आझाद म्हणाले.


मुस्लीम बांधवांसोबतच इतर अल्पसंख्याक समाजानेही या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची गरज आहे. शीख, पारशी, खिश्चन बांधवांचा ओढा या महामंडळाकडे कमी आहे. त्यामुळेच अकोल्यातील गुरुद्वाराला भेट देऊन मी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणांसाठी महामंडळाच्या कर्जाच्या सुविधांचा लाभ घ्यावा.
- हाजी हैदर आझम

 


Web Title: Proposal of 1,000 crores for Maulana Azad Minority Corporation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.