अकोला : जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, निवडणूक रिंगणातील उमेदवारांचा प्रचार बुधवारी सायंकाळी संपणार आहे. त्यामुळे गावागावांत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये १० ग्रामपंचायतींच्या सदस्यांची अविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे २१४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची मुदत बुधवार, १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांचा गावागावांत सुरू असलेला निवडणूक प्रचार बुधवारी सायंकाळी थांबणार आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवार मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर देणार आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनामार्फत मतदानाची तयारी करण्यात येत आहे.