कुरूम (जि. अकोला) : अभ्यास दौर्यावरून परतणार्या भंडारा जिल्ह्यातील शिक्षकाचा रस्ता ओलांडत असताना चार चाकी गाडीची धडक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कुरूम शिवारातील एका ढाब्यासमोर १६ डिसेंबरच्या रात्री १२.३0 वाजता घडली. भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समितीमधील शिवनाळा गोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंतर्गत येणार्या केंद्र सावरला येथील निवडलेल्या दत्तक शाळांमधील डी.के. घरत, बी.एम. सलामे, वाय.एच. ढोरे, जे.पी. मंडे, आनंदकुमार मेश्राम, एच.के. वाकडे, आर.जी. हटवार व शिवशंकर घोडीवार हे आठ शिक्षक सातारा जिल्ह्यातील कुमठे बिट येथे १0 ते १६ डिसेंबरदरम्यान अभ्यास दौर्यावर गेले होते. ते अभ्यास दौरा आटोपून नागपूरकडे परत जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील कुरुमजवळील एका ढाब्यावर बुधवारी रात्री १२.३0 वाजता चहा पिण्यासाठी थांबले. त्यापैकी नागपूरच्या लक्ष्मीनगरातील रहिवासी असलेले रवींद्र गुलाबराव हटवार (४३) हे लघुशंकेकरिता रस्त्याच्या दुसर्या बाजूला गेले. तिकडून रस्ता ओलांडून ते ढाब्याकडे परत येत असताना अमरावतीकडून अकोल्याकडे जाणार्या पांढर्या रंगाच्या एम.एच.0१ बी.एफ. २९७८ क्रमांकाच्या चार चाकी गाडीने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात हटवार यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून लगेच पसार झाला.
अभ्यास दौ-यावरून परतणा-या शिक्षकाचा अपघातात मृत्यू
By admin | Updated: December 18, 2015 02:17 IST