अकोला : जवाहरनगरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या मुलाने युवतीची छेड काढली. त्याला युवतीच्या भावाने विरोध केला असता, पोलीस अधिकार्याच्या मुलाने आपले कोणी काहीच बिघडवून शकत नसल्याच्या अविर्भावात त्याला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी, रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. युवतीच्या भावाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवाहरनगरामधील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या मुलाने घराजवळच राहणार्या एका गरीब कुटुंबातील १८ वर्षीय युवतीची छेड काढली. ही बाब युवतीने घरी सांगितल्यावर तिच्या इयत्ता बारावीमध्ये शिकणार्या भावाने या पोलीस अधिकारीपुत्राला गाठून त्याला जाब विचारला. त्यांच्या वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. पोलीस अधिकार्याच्या मुलाने घरचाच कायदा समजून युवतीच्या भावास बेदम मारहाण केली. एवढी की, हा भाऊ बेशुद्ध पडला. त्यामुळे पोलीस अधिकार्याच्या चिरंजीवाची घाबरगुंडी उडाली. त्यानेच सिव्हिल लाइन पोलिसांना घटनेची माहिती दिली. मारहाण केलेल्या भावाला त्याच्या मित्रांनी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. हे प्रकरण आपल्यावर शेकू नये, यासाठी पोलीस अधिकार्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका पदाधिकार्याला यात मध्यस्थी करावी लागली. त्यांनी युवतीच्या कुटुंबावर दबाब आणण्याचा प्रयत्न चालविला. युवतीच्या भावाच्या मित्रांनी याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री १२.१५ वाजेपर्यंत तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही.
पोलीस अधिका-याच्या मुलाने काढली युवतीची छेड
By admin | Updated: January 9, 2015 01:44 IST