अकोला: विनापरवाना, विनाक्रमांक, फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकीस्वारांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेसोबतच शहरातील सहा पोलीस ठाण्यांतर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. चौकांचौकामध्ये उभे राहून पोलीस कर्मचारी दुचाकीस्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत आहेत. शहरात अनेक विनापरवाना, विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकी धावतात. शाळा-महाविद्यालये, शिकवणी वर्गात जाण्यासाठी पालकही त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी सोपवितात. परिणामी अपघाताच्या घटना घडतात. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दुचाकी चालविणार्या मुलांना पकडले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतरही जिल्हाधिकार्यांना अग्रसेन चौकामध्ये विद्यार्थी दुचाकी चालविताना दिसले. त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांची सभा घेऊन मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास थेट पालकांवरच फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला होता. वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांसोबतच सहा पोलीस ठाण्यांनी दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. आठ दिवसांपासून पोलिसांनी चौकाचौकांमध्ये दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास सुरुवात केली. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक बापूराव चव्हाण यांनी तोष्णीवाल ले-आउट परिसरात मोहीम राबवून ४५ दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. मंगळवारी खदान पोलिसांनी जेल चौक, कौलखेड चौक, शासकीय दूध डेअरीजवळ मोहीम राबविली. मोहिमेदरम्यान विनानंबर, फॅन्सी नंबर प्लेट लावून वा विनापरवाना दुचाकी चालविणार्या युवकांवर कारवाई करण्यात आली.
दुचाकीस्वारांवर कारवाईचा पोलिसांचा धडाका!
By admin | Updated: December 23, 2015 02:40 IST