Pigs rise in the Mayor, Deputy Mayor's Division | महापौर, उपमहापौरांच्या प्रभागात डुकरांचा उच्छाद
महापौर, उपमहापौरांच्या प्रभागात डुकरांचा उच्छाद

अकोला: शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, त्यामध्ये महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्या प्रभागांचाही समावेश आहे. वराह पालनाच्या व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करणारे वराह पालक महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी केली असता, त्यावर उद्या बुधवारी आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत ठोस तोडगा निघतो की आयुक्त नेहमीप्रमाणे आश्वासनांचे ‘चॉकलेट’ देतात, याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उघड्यावर शौच करणाऱ्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्याची मोहीम मनपाने पार पाडली. मनपाने शहर हगणदरीमुक्तीसाठी ठोस प्रयत्न केले असले तरी, आता डुकरांच्या समस्येने त्यात भर घातली आहे. डुकरांच्या विष्ठेतून परिसरात दुर्गंधी व घातक जीवाणू पसरत असल्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी अकोलेकरांकडून होत आहे. सर्वपक्षीय नगरसेवकच नव्हे, तर खुद्द महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्या प्रभागात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात खुद्द सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी आयुक्त संजय कापडणीस यांना पत्राद्वारे वारंवार शहरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

तोडगा निघेल का?
भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सतत पत्रव्यवहार करून मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वी अनेकदा केली आहे. त्यावर पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे थातूरमातूर आश्वासन आयुक्त कापडणीस यांनी दिले होते. या मुद्यावर अकोलेकर त्रस्त झाले असताना आयुक्तांकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याने उद्याच्या बैठकीत तोडगा निघेल का, याकडे लक्ष लागले आहे.

‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही?
वराह पालनातून वर्षाकाठी लाखो रुपयांची रग्गड कमाई करणारे बहुतांश व्यावसायिक महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून सेवारत आहेत. शहरातील हॉटेल व्यावसायिकांना परिसरात अस्वच्छता पसरविल्याप्रकरणी मनपाकडून दंड आकारणी केली जाते; परंतु रहिवासी वस्त्यांमध्ये डुकरांच्या माध्यमातून किळसवाणी घाण व अस्वच्छता पसरविणाºया संबंधित मनपा कर्मचाºयांवर आयुक्त कापडणीस कारवाईचा बडगा उगारतील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

 


Web Title: Pigs rise in the Mayor, Deputy Mayor's Division
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.