अकोला : मतदान हा राज्यघटनेने दिलेला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे; परंतु या अधिकाराचा वापर करण्याविषयी मोठी उदासीनता आहे. परिणामी मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी राहते. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी अधिकाधिक जनजागृती करण्याचा निर्धार बुधवारी ह्यलोकमतह्णच्या परिचर्चेत प्रशासकीय अधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी यांनी बोलून दाखविला. ह्यलोकमतह्णच्यावतीने ह्यमतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी उपाययोजनाह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, मतदान जनजागृती अभियानाचे समन्वयक प्रकाश अंधारे, खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू, जि.प. शाळा भौरदचे मुख्याध्यापक रुपसिंग बागडे, शिवाजी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. जीवन पवार, बबन कानकिरड व ह्यपहाटह्ण या स्वयंसेवी संस्थेचे संचालक आशिष कसले आदी मान्यवर सहभागी झाले होते. सर्वच सहभागी वक्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी केवळ शासनच नाही तर प्रत्येकानेच पुढे आले पाहिजे. मतदानाचे महत्त्व मतदारांच्या मनात बिंबविणे आवश्यक असल्याचेदेखील या वक्त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या प्रतिनिधींनी मतदान जागृतीसाठी शासन स्तरावर व्यापक प्रयत्न करण्यात आले असल्याचे सांगितले. स्विप अंतर्गत हे सर्व उपक्रम राबविण्यात येत आहेत. जागृती रॅली तसेच ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावपातळीवर जागृती केली जात आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन युवकांना मतदानासाठी आकर्षित केले जात आहे. महिलांसाठी रॅलीचे आयोजन केले आहे. मोहल्ला व वार्ड अँम्बेसिडर नियुक्त करण्यात आले आहेत. ७0 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते निश्चितच पूर्ण होईल, असे या प्रतिनिधींनी सांगितले. शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी जे सातत्याने मतदान करीत नाही, त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत मांडले. प्रत्येकाने आपल्या वार्डात, परिसरात जागृती केली पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात मतदान प्रक्रिया प्रात्यक्षिक स्वरुपात शिकविली पाहिजे. प्रतिज्ञापत्र भरूनदेखील जागृती होत आहे. उच्च वर्ग आणि मध्यम वर्गालादेखील लक्ष्य केले पाहिजे, असे या प्रतिनिधींनी सांगितले. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मतदान जागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन अधिक व्यापकपणे साजरा केला पाहिजे. सोबतच नोटा विषयी जनजागृती केली गेली पाहिजे, असे सांगितले.
जनजागृतीतून वाढविणार मतदानाची टक्केवारी
By admin | Updated: October 2, 2014 01:48 IST