लाखपुरी सर्कलमध्ये पोलिओ लसीकरण
लाखपुरी : लाखपुरी सर्कलमध्ये बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी डॉ. रूस्तम दामले, डाॅ. निमोदिया शंकर पाटील, नितीन सुरजुसे, अक्षय लकडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
हातगाव येथे लसीकरण उत्साहात
मूर्तिजापूर : ग्रामपंचायतीत १ फेब्रुवारी रोजी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पंचायत समिती सदस्य प्रकाश वानरे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. या वेळी अंगणवाडी सेविका मालू दाते, आशा स्वयंसेविका गोपकर उपस्थित होत्या. या वेळी गावात पोलिओविषयी जनजागृती करण्यात आली.
सराळा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन
बार्शीटाकळी : तालुक्यातील सराळा येथे ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान श्रीमद् भागवत कथा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सराळा येथील संत गजानन महाराज मंदिरात हभप केशव महाराज मोरे कथा सांगणार आहेत. कार्यक्रमाला स्वामी अक्षयानंद महाराज, दिलीपबाबा, परमहंस बाबू महाराज राहीत, योगानंद महाराज उपस्थित राहतील.
ढाबे, हॉटेल्सवर विनापरवाना दारू विक्री
चोहोट्टा बाजार : अकोट मार्गावरील ढाबे व हॉटेल्समध्ये विनापरवाना देशी, विदेशी दारूची विक्री करण्यात येत आहे. ढाब्यांवर तर सर्रास दारू मिळत आहे. याकडे मात्र दहीहांडा पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
अडगाव : वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या शेतांमध्ये हरभरा पीक आहे. हरभरा पिकांमध्ये शिरून वन्य प्राणी पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतात राखणीसाठी जावे लागत आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोरोना नियमांची पायमल्ली
बाळापूर : कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी धोका कायम आहे. असे असतानाही नागरिक बेफिकीर दिसत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. बाजाराच्या दिवशी तर विक्रेते व ग्राहकांकडून कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र बाळापूर शहरात दिसत आहे.