तरणतलाव परिसरात पालकांना ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:24 PM2019-04-29T12:24:18+5:302019-04-29T12:24:24+5:30

जलतरण तलाव परिसरात पालकांनी येऊ नये, असा आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी काढला असल्यामुळे पालक वर्गात रोष निर्माण झाला आहे.

Parents 'no entry' in swimming area |  तरणतलाव परिसरात पालकांना ‘नो एन्ट्री’

 तरणतलाव परिसरात पालकांना ‘नो एन्ट्री’

googlenewsNext

- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: शहरातील एकमेव असलेल्या वसंत देसाई क्रीडांगण येथील तरणतलावामध्ये उन्हाळी सुट्यांमध्ये पोहणे शिकायला ८ ते १४ वर्ष वयोगटातील मुले-मुली येतात. आपल्या मुलांसोबत काही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी पालक वर्ग येथे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसतात; परंतु जलतरण तलाव परिसरात पालकांनी येऊ नये, असा आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी काढला असल्यामुळे पालक वर्गात रोष निर्माण झाला आहे.
पालकांनी तलाव परिसरात न येता बाहेरच थांबावे, असे देखील जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सुचविले आहे. यासंदर्भात पालकांसोबत बैठक घेऊन सर्व सूचना क्रीडा अधिकारी यांनी दिल्यात; परंतु आपल्या मुलांकडे प्रेक्षक गॅलरीत बसून लक्ष देता येईल, तसेच मुले कसे पोहतात, हे पाहता यावे, यासाठी पालक वर्गाला तरणतलाव परिसरात प्रवेश द्यावा, अशी मागणी पालक वर्गाची आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला निर्णय
जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांना याबाबत विचारले असता, सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे लोकमतशी संवाद साधताना सांगितले. सध्या ९ बॅच असून, जवळपास ८०० नागरिक पोहायला येतात. यामध्ये महिला, पुरुष आणि बालकांचा समावेश आहे. प्रत्येक बॅचमध्ये लहान मुलांचादेखील आहेत. ८ ते १४ वर्ष वयोगटातील हे शिकावू स्विमर्स आहेत. या मुलांचे सर्व पालक आतमध्ये येत असल्याने लाइफ गार्डला व्यत्यय होतो. मधामधात उभे राहत असल्याने लाइफ गार्डला समोरचे दिसत नाही. एखादी अप्रिय घटना घडू नये, यासाठी लाइफगाडला सतत चौफेर नजर ठेवावी लागत असते. सर्व पालकांची बैठक घेऊन सर्व मुलांना एकाच बॅचमध्ये पाठवावे, असा पर्यायदेखील पालकांसमोर ठेवला असल्याचे जाधव यांनी सांगितले.
अशी ठेवली सुरक्षा
सर्व स्विमर्सच्या सुरक्षितेसाठी ४ पुरुष व १ महिला लाइफ गार्ड नियुक्त केले आहेत. तसेच लाइफ जॅकेट आणि शूज उपलब्ध केले आहेत. आपत्ती उद्भवल्यास लांब बाबू तयार ठेवलेले आहेत. दोन सायरन लावले असून, आपत्तीच्या वेळी सायरन वाजवावा, असे फलक लावलेले आहेत. आरोग्यविषयक समस्या असल्यास लहान मुलांसाठीच नव्हे तर सर्व स्विमर्ससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. रात्री आठनंतर सुरक्षा रक्षकाशिवाय कोणासही तरणतलाव परिसरात प्रवेश नाही. दररोज स्विमिंग टॅँक क्लोरिनने क्लिन केल्या जात असल्याचेदेखील आसाराम जाधव यांनी सांगितले.
 

 

Web Title: Parents 'no entry' in swimming area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.