लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्याला इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश देण्याकरिता आता पालकांनाही रात्रीचा दिवस करावा लागत आहे. इंग्रजी शाळेतील नर्सरीमध्ये मुलांना प्रवेश देण्यासाठी पालकांना नामांकित शाळेसमोर रात्रभर मुक्काम ठोकावा लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.आधुनिक काळात दर्जेदार शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याने प्रत्येकाचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडे आहे. जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावल्याची नेहमीचीच ओरड आहे. या पृष्ठभूमीवर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेवच फुटले असून, या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत. या शाळा प्रवेशापोटी शिक्षण शुल्काच्या नावाखाली मोठी रक्कम घेत असल्या, तरी ती मोजण्याचीही पालकांची तयारी आहे. काही शाळांमध्ये शिक्षण शुल्क म्हणून मोठी रक्कम मोजल्यास सहजच प्रवेश मिळतो. मात्र, काही शाळांमध्ये पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांना मोठी धडपड करावी लागते. शहरातील एका नामांकित शाळेतील मोजक्या जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असल्याने, या शाळेसमोर रविवारी रात्री पालकांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळी ऐनवेळी उडणारी तारांबळ टाळण्यासाठी पालकांनी रात्रभर शाळेसमोर मुक्काम ठोकला. रात्र या शाळेसमोर काढल्यानंतर सोमवारी सकाळी ८ वाजता पालकांना प्रवेश अर्जांचे वाटप करण्यात आले. अर्ज भरल्यानंतरही प्रवेश मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी बोलून दाखविल्या.पालकांनी दाखविली स्वयंशिस्त!रविवारी रात्री शाळेसमोर पालकांची गर्दी झाली होती. प्रवेश अर्ज घेण्यासाठी शाळेच्या फाटकासमोर सकाळी गर्दी होऊन तारांबळ उडू नये, यासाठी जमलेल्या पालकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवित सर्वांच्या नावांची नोंद एका रजिस्टरमध्ये केली. या रजिस्टरमध्ये रात्री उशिरापर्यंत जवळपास २२५ पालकांनी त्यांच्या नावांची नोंद केली होती. सोमवारी सकाळी या यादीतील क्रमानुसारच प्रवेश अर्ज घेण्यासाठी पालकांनी रांग लावली होती. रात्रभर शाळेसमोर मुक्काम करणाऱ्या पालकांना काही सहृदयी नागरिकांनी पोहे, पाणी पाउचचे वाटप केले.
मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची ‘रात्रशाळा’!
By admin | Updated: June 13, 2017 00:34 IST