प्रदीप गावंडे
निहिदा : वातावरणात झालेल्या बदलामुळे पिंजर परिसरात व्हायरल फिव्हरची साथ पसरल्याचे चित्र आहे. परिसरातील गावांत ताप, सर्दी, खोकला, हात-पाय दुखणे आदी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. दुसरीकडे, पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६४ खेडेगावे जोडली आहेत. त्यामुळे परिसरातील रुग्णांची नेहमीच गर्दी असते. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव दिसून येत आहे. रुग्णालय लवकर उघडले जात नाही. रुग्णालयात अस्वच्छतेचे वातावरण, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आदी समस्यांच्या विळख्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सद्य:स्थितीत परिसरात व्हायरल फिव्हरची साथ पसरली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील रुग्ण खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जात असल्याने रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. (फोटो)
-------------------
अनुभवी डॉक्टारांची कमतरता
पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दररोज २५० ते ३०० रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात होते. मात्र सद्य:स्थितीत नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनुभवी डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
-------------------------------------------------------
साथ रोखण्यासाठी जनजागृतीची गरज
पिंजर परिसरात व्हायरल फिव्हरची साथ पसरली असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत व्हायरल फिव्हरची साथ रोखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच गावात फवारणी, हातपंपांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे आदी कामे करण्याची मागणी होत आहे.
-------------
पिंजर येथे रुग्णांची समस्या लक्षात घेऊन दुसऱ्या अनुभवी डॉक्टरची नियुक्ती करून रुग्णांची गैरसोय दूर करण्यात येईल. व्हायरल फिव्हरची साथ रोखण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता राखावी.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला