ऑनलाइन धान्य वाटपाचे प्रमाण ८४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:24 PM2019-12-02T15:24:15+5:302019-12-02T15:24:39+5:30

शिधापत्रिकांच्या संख्येनुसार एकूण ८४.९३ टक्के लाभार्थींना आॅनलाइन वाटप केले जात आहे.

Online grain allocation ratio at 84% | ऑनलाइन धान्य वाटपाचे प्रमाण ८४ टक्क्यांवर

ऑनलाइन धान्य वाटपाचे प्रमाण ८४ टक्क्यांवर

Next

अकोला : जिल्ह्यात ई-पॉस मशीनद्वारे आॅनलाइन धान्य वाटपाच्या प्रक्रियेत आता ८४ टक्के लाभार्थींना वाटप केले जात आहे. त्यानुसार रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक ओळख पटवून पात्र लाभार्थींनाच लाभ दिला जात आहे. उर्वरित लाभार्थींनी शिधापत्रिकांची तत्काळ आॅनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने रास्त भाव दुकानदारांना केले आहे.
जिल्ह्यात २ लाख ९४ हजार ४२९ शिधापत्रिकांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. या शिधापत्रिकांमध्ये तब्बल १७ लाख ३० हजार ६७० सदस्य आहेत. त्यातील ६ लाख ७१ हजार ४८७ सदस्यांचे आधार सिडिंग झाले आहे. २ लाख ५० हजार ७५ शिधापत्रिकाधारकांना प्रत्यक्ष धान्य वितरणाचा लाभ दिला जात आहे. शिधापत्रिकांच्या संख्येनुसार एकूण ८४.९३ टक्के लाभार्थींना आॅनलाइन वाटप केले जात आहे.
रास्त भाव दुकानदारांनी अद्यापही आॅनलाइन नोंदणी न झालेल्या शिधापत्रिकांमधील सदस्यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, बँक पासबुक, गॅस ग्राहक बुक ही कागदपत्रे तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात तसेच शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय यांच्याकडे दाखल करावी. ई-पॉस मशीनवर पडताळणीमध्ये अडचणी तसेच त्याबाबत कोणत्याही शिधापत्रिकाधारकांची शंका, तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुक्याचे निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक यांच्याकडे लेखी अर्ज द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोणताही पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत स्वस्त धान्य दुकानदार, पुरवठा विभागाची जबाबदारी आहे. त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. आॅनलाइन रजिस्ट्रेशन झालेल्या शिधापत्रिकांना कोणत्याही परिस्थितीत आॅफलाइन धान्य वाटप करू नये, तसे केल्यास संबंधित दुकानदारांवर कडक कारवाईचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

 

Web Title: Online grain allocation ratio at 84%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला