प्रत्येक तालुक्याला एक हजार ‘रॅपिड टेस्ट’ किट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 01:20 PM2020-07-15T13:20:33+5:302020-07-15T13:20:41+5:30

तालुकानिहाय एक हजार रॅपिड टेस्ट किटचे वितरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

One thousand 'Rapid Test' kits for each taluka! | प्रत्येक तालुक्याला एक हजार ‘रॅपिड टेस्ट’ किट!

प्रत्येक तालुक्याला एक हजार ‘रॅपिड टेस्ट’ किट!

Next

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव रोखण्यासाठी तालुका स्तरावर सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून आशा अतिजोखमीच्या रुग्णांची यादी तयार करून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमध्ये रॅपिड टेस्ट उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी तालुकानिहाय एक हजार रॅपिड टेस्ट किटचे वितरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट किटचा प्रायोगिक तत्त्वावर पातूरमध्ये पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर आता इतरही तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमध्ये रॅपिड टेस्टची मोहीम राबविल्या जाणार आहे; परंतु तत्पूर्वी तालुका स्तरावर सर्वेक्षण करून अशा व्यक्तींची यादी तयार केली जाणार आहे. तालुका स्तरावर या सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जात आहे, तसेच त्यांच्यामध्ये इतर दुर्धर आजार आहेत की नाही, यासंदर्भातही सर्वेक्षणाच्या माध्यमातून आशा वर्कर माहिती संकलीत करत आहेत. यासोबतच गर्भवतींचीदेखील स्वतंत्र यादी तयार करण्यात येत आहे. अशा अतिजोखमीच्या व्यक्तींची तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमध्ये रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी परिसरातील शाळा किंवा समाजमंदिराचा आधार घेण्यात येईल.


असे होणार वितरण

प्रत्येक तालुक्यात एक हजार किट दिले जाणार आहे. त्यात ५०० शहरी, तर ५०० ग्रामीणसाठी दिले जातील. गर्भवतींसाठी ५०० जिल्हा स्त्री रुग्णालय, तर ५०० सर्वोपचार रुग्णालय तसेच दोन हजार रॅपिड टेस्ट किट महापालिकेला दिले जाणार आहे.

हे असणार सर्वेक्षणाच्या केंद्रस्थानी
कंटेनमेन्ट झोन, हायरिस्क व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे (५० वर्षावरील )

जिल्ह्यात कोविड टेस्ट झपाट्याने व्हावी, या अनुषंगाने दहा हजार रॅपिड टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. नियोजनानुसार तालुकानिहाय या किटचे वितरण केले जात आहे. तत्पूर्वी प्रत्येक तालुक्यात कंटेनमेन्ट झोनमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून, त्यानुसार तालुकानिहाय सर्वेक्षण केले जाईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: One thousand 'Rapid Test' kits for each taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.