जांभा गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करा; अन्यथा सामूहिक आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:18 AM2021-08-01T04:18:16+5:302021-08-01T04:18:16+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यात पूर्णा नदीवर घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा नदीवर मंगरूळ कांबे येथे आणि उमा नदीवर रोहणा येथे बॅरेजेस मंजूर ...

One hundred percent rehabilitate Jambha village; Otherwise mass self-immolation | जांभा गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करा; अन्यथा सामूहिक आत्मदहन

जांभा गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करा; अन्यथा सामूहिक आत्मदहन

Next

मूर्तिजापूर : तालुक्यात पूर्णा नदीवर घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा नदीवर मंगरूळ कांबे येथे आणि उमा नदीवर रोहणा येथे बॅरेजेस मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या बॅरेजेसमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये जांबा बुद्रुक गावाचा समावेश असून, या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडल्याने गावाचा विकास थांबला आहे. त्यामुळे जांभा येथील १०० टक्के पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. प्रश्न मार्गी लागला नाही, तर सामूहिक आत्मदहनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

जांभा येथील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गाव १०० टक्के बाधित असल्याने तसा अहवाल कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग यांच्या वतीने २ डिसेंबर २०१० रोजी सादर केला. गावाचे शंभर टक्के पुनर्वसन होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यातच पुनर्वसन कलम (११) जाहीर झालेले असल्याने जांभा बुद्रुक गावामध्ये विकासाची कामे करण्याबाबत पूर्ण मनाई करण्यात आली आहे. त्यानंतर २०१६ मध्ये सदर गाव अंंशत: बाधित असल्याबाबतचा जावईशोध लावण्यात आला. विकासाचा मार्ग खुंटल्याने गावकऱ्यांनी यापूर्वी गावात साखळी उपोषण सुरू केले होते. त्यावेळीदेखील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले होते. सद्य:स्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी गाव १३ टक्के बाधित क्षेत्रात येत आहे, असे सांगून ३५० घरांपैकी ७० घरांंची पुनर्वसन यादी तयार केली आहे. गावात शंभर फुटांपर्यंत माती असल्यामुळे गावातील जमीन दलदल होऊन गावातील घरे व इमारती क्षतिग्रस्त होऊन जमीनदोस्त होण्याचा धोका आहे. गावाच्या १०० टक्के पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन गावकरी छेडणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. प्रश्न मार्गी लावण्याकरिता गाव पुनर्वसन संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब ठोकळ, तर उपाध्यक्ष म्हणून सुनील जाधव असून, या समितीत डॉ. राजकुमार ठोकळ, प्रभाकर कांबळे, विठ्ठलराव ठोकळ, गजानन इंगळे आदींचा समावेश आहे.

-----------------

शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी!

गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्ता रोको, शोले आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली, आत्मदहन, जेलभरो, रास्ता रोको, अशा प्रकारची आंदोलने न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये गावकऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

----------------------------------------

गावाचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगितल्यावरून आम्ही आमच्या शेती सदर प्रकल्पाकरिता दिल्या. पाच वर्षांनंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी भूमिका बदलून अंशत: पुनर्वसनाचे सांगितले. यामुळे ही भूमिका संशयास्पद असून, गावाचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे, यासाठी आंदोलन करण्याची तयारी आहे.

-विठ्ठलराव ठोकळ, माजी सरपंच जांभा बु.

--------------------------

Web Title: One hundred percent rehabilitate Jambha village; Otherwise mass self-immolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.