Now women's watch on water tanker | टँकरच्या फेऱ्यांवर आता महिलांची नजर 
टँकरच्या फेऱ्यांवर आता महिलांची नजर 

अकोला : ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात मोठे घोटाळे होत असल्याची ओरड आहे. त्यामुळे गावांमध्ये टँकर पोहोचतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक गावात दोन महिलांवर जबाबदारी देण्यात येत आहे. टँकरची फेरी आल्याच्या प्रमाणपत्रावर त्यांची स्वाक्षरी असल्याशिवाय देयक अदा केले जाणार नाही, असे निर्देशच राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत.
भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो; मात्र हा पुरवठा करताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्या जात असल्याचे सातत्याने पुढे येत आहे. शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघड झाले. त्यामध्ये टँकर चालकांकडे लॉगबुकच उपलब्ध नाहीत, तर टँकरमध्ये बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणाही कुचकामी असल्याचे समोर आले आहे. एका ठिकाणी तर टँकर चक्क बेवारस उभा असल्याचेही दिसून आले. या सगळ्या प्रकाराच्या तक्रारीही झाल्या. त्यानंतर जाग आलेल्या शासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठ्याच्या पद्धतीत सुधारणा केली.
टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणी होतो की नाही, यावर लक्ष देण्याची पद्धतही आधीच ठरवून देण्यात आली. त्याची आता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार टँकर गावात वेळेवर पोहोचतो की नाही, किती फेºया होतात, किती क्षमतेच्या टँकरमधून होतात, याकडे लक्ष दिल्यास टँकर घोटाळा रोखला जाऊ शकतो. त्यासाठी गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन महिला सदस्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार टँकरच्या फेऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे.
- प्रमाणपत्रावर महिलांची स्वाक्षरी
प्रत्येक फेरीला टँकर चालक वाहनाचे लॉगबुक तसेच प्रमाणपत्रावर त्या दोन महिलांच्या महिलांची स्वाक्षरी घेणार आहे. त्यावर गावात टँकर पोहोचल्याची तारीख, वेळ नोंद केली जाईल. महिला सदस्यांची स्वाक्षरी नसल्यास टँकरचे देयक अदा केले जाणार नाही. लॉगबुकच्या नोंदीची माहिती प्रत्येक दिवशी पंचायत समिती स्तरावर व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पाठवावी लागणार आहे. टँकरच्या टाकीच्या क्षमतेसह संपूर्ण माहिती टँकरच्या दर्शनी भागात लावली जाणार आहे.
- टंचाई कक्षही सतर्क राहणार!
जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षाकडून टँकरची जीपीएस प्रणाली अद्ययावत आहे की नाही, हे तपासले जाईल. प्रत्येक टँकरवर जीपीएस कार्यरत करण्याचेही बजावण्यात आले.

 


Web Title:  Now women's watch on water tanker
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.