अकोला: नवीन पीक कर्ज वाटप करताना पुनर्गठन केलेल्या कर्ज रकमेचा पहिला हप्ता आणि दोन वर्षाच्या कर्ज रकमेवरील व्याज शेतकर्यांकडून वसूल करण्यात येत असल्याबाबत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासंदर्भात सात दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेशही जिल्हाधिकार्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे याबाबत लोकमतने १२ आणि १३ ऑगस्टच्या अंकात बँकेकडून होत नसलेल्या कर्ज हप्ता व व्याज वसुलीचे वृत्त प्रकाशित केले होते. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सन २0१४-२0१५ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्यांना यावर्षी पुन्हा नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. परंतु, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सन २0१३-१४ मधील पीक कर्जाचे पुनर्गठन करून, नवीन कर्ज वाटप करताना पुनर्गठन करण्यात आलेल्या कर्ज रकमेचा पहिला हप्ता तसेच २0१३-१४ या वर्षातील पीक कर्जाच्या रकमेवर १0 टक्के व्याज आणि त्याच कर्ज रकमेवर सन २0१४-१५ या वर्षासाठी १३ टक्के दराने व्याज आकारले जात आहे. कर्जाचे पुनर्गठन केल्यानंतर पुनर्गठन केलेल्या कर्ज रकमेचा पहिला हप्ता आणि मागील दोन वर्षाच्या कर्ज रकमेवरील व्याजाची वसुली करून, नवीन कर्ज वाटप करणे ही बाब शासनाच्या निर्णयाविरुद्ध आहे. त्यामुळे शेतकर्यांना नवीन कर्ज वाटप करताना कर्जाचे पुनर्गठन केलेल्या रकमेचा पहिला हप्ता व मागील दोन वर्षावरील कर्ज रकमेवरील व्याजाची वसुली का करण्यात येत आहे, यासंदर्भात विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बजावली आहे. याबाबत सात दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेशही जिल्हाधिकार्यांनी जिल्हा बँकला नोटीसद्वारे दिला आहे.
जिल्हा बँकेला जिल्हाधिका-यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
By admin | Updated: August 31, 2015 01:50 IST