लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात ‘कूल कॅन’मध्ये पाणी विकण्याचा गोरखधंदा गल्लीबोळात सुरू असून, कोणत्याही नियमाचे पालन न करता अप्रमाणित पाणी ‘शुद्धते’च्या नावाखाली सर्रास विकले जात आहे. या गोरखधंद्याला भीषण पाणीटंचाईने सुगीचे दिवस आले आहे. शुद्ध आणि अशुद्धतेचा विचार न करता ग्राहक ‘कूल कॅन’ घेऊन तहान भागवित आहेत. यातून मानवी आरोग्याशी खेळ सुरू असून, प्रशासनासह आरोग्य विभागाचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. उन्हाळ्यातच नव्हे, तर बाराही महिने ‘कूल कॅन’मधील पाणी विकण्याचा व्यवसाय अलिकडच्या काळात तेजीत आला आहे. प्रत्येक जण आरोग्याला जपत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. हॉटेल, पानटपरी, कार्यालयांसह पाणपोईवरसुद्धा ‘कूल कॅन’द्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. थंडगार असणारे पाणी शुद्धच असेल, या मानसिकतेतून कोणताही विचार न करता प्रत्येक जण तहान भागवित आहे; मात्र या मागील वास्तविकता अतिशय भीषण आहे. ‘कूल कॅन’चा व्यवसाय करताना कुठलेही मापदंड पाळले जात नाहीत, इतकेच काय तर अकोला शहरासह जिल्ह्यात शेकडोंच्या घरात असे वॉटर प्लांट ठिकठिकाणी आहेत. विहीर, बोअरवेल आणि टंचाई काळात टँकरचे पाणी घेऊन ‘कूल कॅन’च्या नावाखाली विकले जात आहे. विशेष म्हणजे ‘कूल कॅन’मधील पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणे गरजेचे असते; मात्र अशा कोणत्याही मापदंडाचा विचार केला जात नाही. पाणी थंड व नितळ केले की ते थेट १५ ते २0 लिटरच्या कॅनमध्ये भरले जाते. वाहनाद्वारे घरपोच सेवा दिली जाते. एका कॅनमागे ३0 ते ३५ रुपये घेतले जातात. अकोला शहराचा विचार करता दररोज हजारो कॅन नागरिकांची तहान भागवित आहेत. जिल्ह्यात प्रत्येक मोठय़ा गावातही असे प्लांट लावण्यात आले आहेत. या फुकटच्या पाण्यावर कोट्यवधींची उलाढाल करण्याचा हा गोरखधंदा सध्या तेजीत आहे.
केवळ ८१ प्लान्टची महापालिकेकडे नोंदअकोल्यात सद्यस्थितीत किती कूल कॅन प्लान्ट कार्यरत आहेत, याची साधी माहिती महापालिकेच्या आरोग्य व पाणी पुरवठा विभागाकडे नाही. हा प्रकारच आपल्या अखत्यारित येतो याचीही जाण येथील अधिकार्यांना नाही. यामुळे तपासणी, गुणवत्ता नियंत्रण हा सर्व सोपस्कार, कोसोदूर आहे. टंचाई काळात पाण्याचा व्यापार करणार्या कूल कॅन प्लान्टधारकांकडून अक्षरश: मानवी आरोग्याशी खेळ सुरू आहे. अकोला महापालिकेकडे ८१ प्लान्टची नोंद आहे. व्यवसाय परवाना देण्यासाठी ही नाममात्र नोंद आहे. वास्तविकतेत मात्र अकोल्यात १४0 प्लान्ट आहेत
अन्न व औषध प्रशासनाची चुप्पी कूल कॅनसाठी तयार होणारे पाणी आणि त्याची विक्री हे अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारित आहे अन् नाहीदेखील. पॅकेज वॉटर संदर्भातच तपासणी व परवाना देण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनास आहे. कूल कॅन ही लुज पॅकिंगमध्ये मोडल्या जाते. त्यामुळे त्यावर कुठलेही नियंत्रण नाही. साधा गुस्माता परवाना घेऊन हा व्यवसाय सुरू करता येतो. शिवाय महापालिका आरोग्य विभाग व ग्रामीण आरोग्य विभागाने अशा प्लान्टच्या पाणी शुद्धतेची तपासणी करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतात, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक नितीन नवलकार यांनी दिली.
आयएसआय मानकासाठी एफडीएची परवानगीअकोला जिल्ह्यात केवळ दोन प्लान्टला भारतीय मानक ब्युरोची (आयएसआय) परवानगी आहे. या दोघांची अधिकृत नोंदणी असून अन्न व औषध प्रशासनाकडून त्यांची नियमित तपासणी होते. पाणी तयार करताना त्या प्लान्टवर यू.व्ही. स्टेरियालझेशन, मायक्रो फिल्टरेशन, ओझनायझेशन संयंत्र असणे गरजेचे आहे. ही यंत्रणा असेल तरच पॅकेज वॉटर विकता येते. मात्र, अकोला शहरात कूल कॅनसाठी असे कोणतेही मापदंड वापरले जात नाही.
कूल कॅनच्या पाण्याने जडतात आजार!कूल कॅनच्या पाण्याचा वापर उन्हाळ्यात आणि समारंभातून मोठय़ा प्रमाणात होतो. हे पाणी पिल्याने घशाचे आजार उद्भवतात. इतकेच नव्हे, तर जलजन्य आजार उद्भवून डायरिया, गॅस्ट्रोसारखे साथीचे आजारही होतात. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळून येते. मात्र, आतापर्यंत सामूहिकरीत्या या संदर्भात कुणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळेच हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे. आता तर टंचाई काळात कूल कॅन पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.