क्षुल्लक वाद विकोपाला, मामाच्या चाकुहल्ल्यात भाच्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 07:22 PM2022-07-19T19:22:07+5:302022-07-19T19:23:12+5:30
Crime News : मामाने भाचाच्या छातीत चाकू भोसकल्याने भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार रोजी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान मेघराज प्लॉट येथे घडली.
कुरुम : पोलीस स्टेशन माना अंतर्गत येत असलेल्या ग्राम कुरुम येथे घरगुती वादातून मामाने भाचाच्या छातीत चाकू भोसकल्याने भाच्याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार रोजी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान मेघराज प्लॉट येथे घडली.
प्राप्त माहितीवरून स्थानिक मेघराज प्लॉट येथे आरोपी सै.वारीस सै. अहमद व मृतक शेख फारुख शेख अहमद हे दोघेही आपल्या पत्नी व मुलांसोबत दोन खोल्याच्या एकाच घरात वेगवेगळे राहत होते.यावेळी आरोपी सै.वारीस सै. अहमद याचा मुलगा पलंगावरुन खाली पडल्याने आरोपीने शेख फारुख शेख अहमद याला तुझ्या मुलाच्या आवाजाने माझा मुलगा हा पलंगावरुन खाली पडला असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. मामा सै.वारीस सै. अहमद याने भाचा शेख फारुख शेख अहमद याच्यावर चाकूने हल्ला केला. शेख फारुख शेख अहमद याच्या छातीत चाकू लागल्याने त्याला जखमी अवस्थेत स्थानिक प्रा. आ. केंद्र कुरुम येथे हलवले व तेथून अमरावती येथील इर्विन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु तिथे डॉक्टरांनी शेख फारुख शेख अहमद यास तपासणी अंती मृत घोषित केले. यावेळी घटनास्थळी मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत,माना पो.स्टे.प्रभारी ठाणेदार राहुल देवकर,उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांचेसह एएसआय दिलीप नागोलकर,हे.कॉ.तेजराव तायडे, ना.पो.कॉ.नंदकिशोर टिकार,पो.कॉ. राजेश डोंगरे,पंकज वाघमारे यांनी भेट दिली असून कार्यवाही सुरू आहे.