लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नवी मुंबई येथून चोरलेला ट्रक गुरुवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखा व जुने शहर पोलिसांनी पकडला. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील मोहम्मद मुकीम मोहम्मद सगीर आणि नवाब अख्तर खुर्शीद यांना अटक केली. ट्रक जप्त केल्याची माहिती नवीन मुंबई पोलिसांना देण्यात आली असून, मुंबई पोलिसांचे पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी अकोल्यात येत आहे. गुरुवारी सकाळी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट पोलिसांनी अकोला पोलिसांसोबत संपर्क साधून, त्यांना मुंबईतील एका भागातून एमएच ४३ वाय.८३८७ क्रमांकाचा ट्रक लंपास झाला असून, हा ट्रक कोलकाताकडे रवाना झाला असल्याचा संशय आहे. या माहितीच्या आधारावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व जुने शहर पोलिसांनी एक पथक राष्ट्रीय महामार्गावर तैनात केले. सकाळी ट्रक व्याळाजवळ पोहोचताच, पोलिसांनी ट्रक अडविला. पोलिसांनी मोहम्मद मुकीम व नवाब अख्तर यांना अटक केली. नवी मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. ट्रक व आरोपी ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस अकोल्यासाठी रवाना झाले आहेत.
नवी मुंबईत चोरलेला ट्रक अकोल्यात पकडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:33 IST