अकोला : छंद आपले आयुष्य आनंदी आणि सुखकर करतात. म्हणून आयुष्यात प्रत्येकानं एक तरी छंद जोपासावा, असे म्हटले जाते. येथील राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात गृहविज्ञानासह संगीत आणि राज्यशास्त्र हे विषय शिकविणार्या प्राध्यापिका जयश्री प्रमोद बंड यांनी खडूपासून विविध शिल्पाकृती निर्माण करण्याचा छंद जोपासला आहे. उपजतच कलेची आणि संगीताची आवड असलेल्या जयश्रीने या कला जोपासण्याची प्रेरणा वडील महादेवराव भुईभार व मामा विठ्ठल वाघ यांच्यामुळे मिळाली. शालेय जीवनात गायनाचे धडे घेत असतानाच विविध पारंपरिक कलाकृती तयार करण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली होती. १९९२ मध्ये श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारल्यानंतरदेखील जयश्रीने आपली कला जिवंत ठेवली. लहानशा खडूवर अत्यंत बारीक कलाकुसर करीत त्यांनी विविध महापुरुष, देवी-देवता आणि इतर कलाकृती साकारल्या आहेत. आकाराने लहान असल्या तरी अत्यंत सुबक व व्यक्तिरेखा ठळकपणे व्यक्त होणार्या या कलाकृतींमध्ये महात्मा गांधी, भगतसिंग, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, सावित्रीबाई फुले, पेशवेकालीन स्त्रीया, विविध आकार आणि प्रकारचे गणपती, साईबाबा, तुळशी वृंदावन, महादेवाची पिंड, विविध काटरून, प्राणी, विविध प्रकारचे मासे, एवढेच नव्हे तर विविध प्रकारचे चेहरे यांचा समावेश आहे. १९८५ मध्ये शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रमोद बंड यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर केवळ पतीचे नव्हे, तर सासू-सासरे वत्सला आणि माधवराव बंड यांचेदेखील प्रोत्साहन आपल्या छंदाला लाभल्याचे त्या सांगतात. महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा मोहोड यांचेदेखील मार्गदर्शन लाभते. जोपासलेल्या छंदाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, अशी जयश्री बंड यांची मनीषा आहे.
छंद माझा वेगळा!
By admin | Updated: December 10, 2014 01:47 IST