अजय डांगे / अकोला
मुंबई येथील पक्ष पदाधिकार्यांच्या काही नियुक्त्यांवरून नाराज झालेले भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सहा वर्षांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद पश्चिम वर्हाडातही उमटले होते. मुंडे यांच्या सर्मथनार्थ अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. चार ते पाच दिवस हे राजीनामा सत्र सुरूच होते. प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावाने ओळखत होते. कार्यकर्त्यांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता, अशा शब्दात त्यांच्या वर्हाडातील सर्मथकांनी स्मृतींना उजाळा दिला. भाजपमधील बहुजन चेहरा, लोकनेता म्हणून ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फौजच तयार केली होती. प्रत्येक कार्यकर्त्याला ते जवळून ओळखत. त्यांचा वर्हाडातील प्रत्येक गावात दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळे मुंडे यांचा प्रत्येक निर्णय, आदेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते शीर्षस्थ मानत. काही वर्षांपूर्वी पक्षाच्या मुंबई येथील पदाधिकार्यांच्या नियुक्तीवरून मुंडे नाराज झाले होते. त्यांनी पक्षनेतृत्वाजवळ आपली नाराजी व्यक्त केली होती; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंडे यांच्या सर्मथनार्थ अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचे अस्त्रच उगारले होते. वर्हाडातील जवळपास ९५0 पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने, पक्षनेतृत्वामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन त्यांना मुंडे यांची नाराजी दूर करणे भाग पडले होते. मुंडे यांचे सर्मथक या आठवणी आज जड अंत:करणाने सांगत आहेत.