बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर उतरल्यामुळे एक-एक मत महत्त्वाचे झाले आहे. मतविभाजन टाळून सामाजिक गणिते आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करीत आहे. आपल्या विरोधात रिंगणात उभ्या असलेल्या व मताधिक्य कमी करण्याची कुवत असलेल्या उमेदवाराची मनधरणी करण्यासाठी आज सर्वच तंत्र वापरण्यात आले. काहीही करा; पण बंडोबा थंडोबा करा, असे संदेश उमेदवारांनी त्यांच्या खास शिलेदारांना दिले आहेत.बुलडाणा मतदारसंघात सेना व भाजपासोबतच काँग्रेसमध्येही बंडाचे निशाण फडकले आहे. शिवसेनेतून पदावरून काढलेले मुन्ना बेंडवाल, भाजपाचे अँड. व्ही. डी. पाटील, काँग्रेसचे एकनाथ खर्चे अशा तिघांनी अर्ज दाखल केले असून, यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न होत असताना त्यांनी रिंगणात कायम राहावे, असाही प्रयत्न दुसर्या बाजूने अनेक हितचिंतकांनी केल्याची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ खर्चे यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याने ते रिंगणात राहणार की नाही, याची उत्सुकता कायम आहे. मेहकर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मंदाकिनी कंकाळ यांनी उमेदवारी दाखल करून राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी आखाडे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. या मतदारसंघात प्रत्येक वेळी हिंदुत्ववादी मते व धर्मनिरपेक्ष मते यांचे मतविभाजन टाळण्यासाठी अपक्षांची मनधरणी केली जाते, यावेळीसुद्धा हा प्रयत्न आहे; मात्र त्यासाठी विशेष मोहीम सुरू असल्याचे कुठे दिसून येत नाही. गुप्त बैठकांवरच जोर आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे रिंगणात नसल्यामुळे त्यांचे सर्मथक सैरभैर आहेत. डॉ.शिंगणे यांच्यावर निष्ठा असलेले कार्यकर्ते त्यांच्या व्यतिरिक्त दुसर्या उमेदवारासाठी मतांचे परिवर्तन करतील का? हा प्रश्न असल्याने राष्ट्रवादीतून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रकार युद्धस्तरावर सुरू होते.जळगाव जामोद मतदारसंघात जातीय समीकरणे डोळय़ासमोर ठेवून आज दिवसभरात जोरदार घडामोडी झाल्या. माळी, कुणबी, पाटील, दलित, बारी, धनगर अशा महत्त्वाच्या व संख्येने मोठय़ा असलेल्या समाजाचे उमेदवार उभे राहिले आहेत. त्यामुळे एका विशिष्ट समाजातील उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर त्या समाजाची मते आपल्याला मिळतील, अशी गणिते प्रत्येक उमेदवार मांडत असल्याने आज दिवसभर त्या दृष्टीने घडामोडी होत होत्या. गुप्त बैठकांमधून उमेदवारी मागे घेण्याची मनधरणी सातत्याने सुरू होती. खामगाव मतदारसंघातही काँग्रेस व भाजपा या प्रमुख पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला न मिळणारी मते खाणारा दुसरा उमेदवार रिंगणात कसा राहील, यादृष्टीनेच मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.चिखली मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये, असा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचे दिसून आले, त्यामुळे उद्या, १ ऑक्टोबर रोजी या प्रयत्नांना किती यश आले, हे स्पष्ट होईल. मलकापूर मतदार संघामध्ये काँग्रेसच्या उमाताई तायडे यांनी बंडाचा झेंडा फडकविला असून, आज मेळावा घेत शक्तीप्रदर्शनही केले, त्यामुळे त्यांची उमेदवारी काँग्रेसला घातक ठरू नये, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.
बंडोबांना थंडोबा करण्यासाठी हालचाली
By admin | Updated: October 1, 2014 00:48 IST