अकोला: महापालिकेच्या सहायक आयुक्त माधुरी मडावी यांना सोयीसाठी देण्यात आलेले शासकीय वाहन दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती उजेडात आली आहे. मडावी यांचा १९ डिसेंबर रोजी उपायुक्तपदाचा प्रभार काढण्यात आला. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी त्यांचा रजेचा अर्ज मनपा कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर शासकीय वाहन मनपाकडे जमा होणे क्रमप्राप्त होते. तसे झाले नसून, या वाहनावरील चालकाकडेसुद्धा वाहन उपलब्ध नसल्याचे समोर आले. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेत वाहनाची शोधमोहीम सुरू केली आहे. मनपामध्ये आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांना सोयीसाठी शासकीय वाहन उपलब्ध करून दिले जाते. मोटार वाहन विभागात पुरेशा प्रमाणात वाहन उपलब्ध नसल्याने अनेकदा वरिष्ठ अधिकार्यांसाठी भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून दिली जातात. सहायक आयुक्त माधुरी मडावी यांना सोयीसाठी एमएच ३0 एच ४४0 क्रमांकाचे वाहन देण्यात आले. यादरम्यान १९ डिसेंबर रोजी मनपा आयुक्त अजय लहाने व मडावी यांच्यात वाद झाल्यानंतर आयुक्तांनी त्याच दिवशी मडावी यांच्याकडील उपायुक्त पदाचा प्रभार काढून घेतला. त्यानंतर मडावी यांचा २१ ते २४ डिसेंबरपर्यंत रजा घेत असल्याचा अर्ज मनपा कार्यालयाला प्राप्त झाला. यावेळी मडावी यांचे शासकीय वाहन मनपात जमा होणे भाग होते; मात्र २१ डिसेंबरपासून या वाहनावरील भोईटे नामक चालकाकडेदेखील सदर वाहन उपलब्ध नसल्याची माहिती आहे. मुळात ही जबाबदारी मोटार वाहन विभागप्रमुख श्याम बगेरे यांची असल्यामुळे बगेरे यांच्यासह चालकावर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
मनपाचे वाहन बेपत्ता; प्रशासनाकडून शोधमोहीम
By admin | Updated: December 23, 2015 02:41 IST