अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या खडकी येथील युवकास खदान पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.
गौरक्षण रोडवरील तुकाराम चौक परिसरातील रहिवासी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला खडकी येथील रहिवासी तेजस गजानन मिसाळ याने १५ एप्रिल रोजी फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फूस लावून पळविण्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास सुरू केला असता आरोपीस सोमवारी अटक केली. तीन दिवस युवती या युवकासोबत असल्याने त्याने शारीरिक अत्याचार केले का हे तपासण्यासाठी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या युवकाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमात वाढ होणार असल्याची माहिती खदान पोलिसांनी दिली.