‘पोकरा’तील अनेक योजना बंद करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 05:33 PM2020-03-01T17:33:51+5:302020-03-01T17:34:28+5:30

आर्थिक लक्ष्यांक हे कमी असल्याची सबब पुढे करीत यातील काही घटक,योजना बंद करण्यात येत आहेत.

Many plans of 'pocra' will be closed! | ‘पोकरा’तील अनेक योजना बंद करणार!

‘पोकरा’तील अनेक योजना बंद करणार!

googlenewsNext

अकोला : शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने राज्यात (पोकरा) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत; परंतु आर्थिक लक्ष्यांक हे कमी असल्याची सबब पुढे करीत यातील काही घटक,योजना बंद करण्यात येत आहेत.
राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी जागतिक बँकेने ४ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे. २०२३-२४ पर्यंत सहा वर्षासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भाचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पाचे सर्वांगीण उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने प्रकल्पातील सर्व योजना, घटक राबविण्यात येणार असल्याचे ठरले आहे. त्यानुसार गाव समूहामध्ये योजनांची अंमलबजावणी होणे क्रमप्राप्त आहे. पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टा क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तथापि,यातील खासगी जमिनीवर राबविण्यात येणारा सामुदायिक शेततळे प्रकल्प बंद करण्यात आला असून, शेळीपालनाबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. तोपर्यंत शेळीपालन योजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे. २६ फेब्रुवारीपूर्वी पूर्वसंमती घेतलेल्या लाभार्थींना शेततळ्यांचे देय अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पाइप, पंप संच, यांत्रिकीकरण व नवीन विहिरी या चार घटकांसाठी यापूर्वी वाटप केलेल्या आर्थिक लक्ष्यांकानुसार त्यासोबतच दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
खारपाणपट्ट्यातील शेततळे, पंप व तुषार संच, शेडनेट, पॉली हाउस, पॉली टनेल, यातील भाजीपाला, फूल पिकांची लागवड, साहित्य, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप, कंपोस्ट उत्पादन, अस्तरीकरणाशिवाय वैयक्तिक शेततळे व अस्तरीकरणासह, भूजल पुनर्भरण, ठिबक तुषार सिंचन संच, हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन करणे आदी घटक,योजना आहेत. यातील अनेक योजना, घटकांची अंमलबजावणी दिलेल्या आर्थिक लक्ष्याकांच्या मर्यादेत करण्यात येणार आहे.


 ‘पोकरा’अंतर्गत केवळ खासगी जमिनीवर घेण्यात येणारा सामुदायिक शेततळे घटक स्थगित करण्यात आला आहे. शेळीपालनाबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत. तोपर्यंत याही घटकाची अंमलबजावणी स्थगित ठेवली आहे.
- गणेश पाटील,
प्रकल्प संचालक,
‘पोकरा’,
मुंबई.

 

Web Title: Many plans of 'pocra' will be closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.