मनपा कर्मचाऱ्यांचा झाडू माेर्चा
अकाेला : मागील अनेक दिवसांपासून महापालिका आयुक्त संजय कापडणीस मनपात फिरकले नसून कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप अखिल भारतीय सफाइ मजदूर काॅंग्रेसने केला आहे. त्यामुळे येत्या २५ जानेवारी राेजी आयुक्तांच्या निवासस्थानापर्यंत झाडू माेर्चा काढणार असल्याचे संघटनेने पत्रकाद्वारे कळविले आहे.
जलवाहिनीसाठी खाेदला रस्ता
अकाेला : शहरात ‘अमृत’ याेजनेंतर्गत नवीन जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. सिव्हिल लाइन चाैक ते जीएमडी मार्केटपर्यंत जलवाहिनीसाठी काही ठिकाणी रस्ता खाेदण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक लक्षात घेता खाेदलेल्या रस्त्याची कंत्राटदाराने अथवा मनपाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.
उघड्यावर कचऱ्याचे ढीग
अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठ ते कमला वाशिम बायपास चाैकपर्यंतच्या मुख्य मार्गालगत ठिकठिकाणी घाणकचरा साचला आहे. या भागातील आराेग्य निरीक्षकांनी हा कचरा दरराेज उचलण्याचे निर्देश देणे अपेक्षित आहे. तसे हाेत नसल्यामुळे साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
काेराेना चाचणीसाठी शिक्षकांची लगबग
अकाेला : इयत्ता नववी, दहावी व बारावीप्रमाणेच आता इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शाळा सुरू हाेणार असल्यामुळे शाळेतील शिक्षकांना काेराेना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेतील शिक्षकांची लगबग सुरू झाली आहे.
कापशी तलावात अवैध मासेमारी
अकाेला: महापालिकेच्या मालकीचा असलेल्या कापशी तलावात मासेमारी करण्यासाठी मनपाने परवानगी दिली आहे. परवानापात्र संस्थेने मासेमारी करणे अपेक्षित असताना या ठिकाणी मागील काही दिवसांपासून अवैध मासेमारी केली जात असल्याचे समाेर आले आहे. याकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.
हरभऱ्यावर किडींचा प्रादुर्भाव
अकाेला : तालुक्यातील अमानतपूर, ताकाेडा, खडकी, भाैरद, डाबकी, भाेड येथील शेतशिवारात हरभऱ्याची माेठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून, पीक जाेमदार असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. अशा स्थितीत काही दिवसांपासून फुलाेरा आलेल्या हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. याविषयी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी हाेत आहे.