खामगाव : वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातील युवती तसेच दोन विवाहित महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यासंबंधी फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून, युवतीसोबतच महिलांचा शोध प्रारंभ केला आहे. शहरातील दालफैलनजीक राठी प्लॉटमधील रहिवासी श्वेता किसनराव ताजने (१९) ही युवती १ जुलै रोजी शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी शाळेत गेली होती; मात्र घरी परतली नाही. याप्रकरणी आजी सुमनबाई नटकुट यांनी पोलिसांत तक्रार दिली. अन्य घटनेत घाटपुरी रोडवरील खराटे ले-आउटमधील नंदा प्रवीणसिंह चव्हाण (४३) ही विवाहिता २९ जून रोजी दवाखान्यात जात असल्याचे सांगून घरून निघून गेली; परंतु घरी परतली नाही. याबाबत रमेशसिंह चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. तिसर्या घटनेत गोपालनगर भागातील सरला अरुण देशमुख (५५) ही महिला काहीही न सांगता १७ जूनपासून घरून निघून गेली. याप्रकरणी त्यांचे पती अरुण देशमुख यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहिता हरविल्याची नोंद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून युवती हरविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हरविलेल्यांपैकी काही युवती शहरात दाखलसुद्धा झाल्या आहेत; मात्र ही प्रकरणे सुरूच आहेत. हरविलेल्या युवती व महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
युवती व दोन विवाहिता बेपत्ता
By admin | Updated: July 3, 2015 23:51 IST