एमडी देता का, एमडी...महाबीजची अवस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 10:54 AM2021-09-13T10:54:03+5:302021-09-13T10:54:17+5:30

Mahabeej's MD Post vaccant : दीड महिना झाला तरी रुचेश जयवंशी रुजू झाले नाहीत

Mahabeej's MD Post vaccant since one and half month | एमडी देता का, एमडी...महाबीजची अवस्था!

एमडी देता का, एमडी...महाबीजची अवस्था!

Next

अकोला : शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा करण्यात महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा (महाबीज)च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी)पदी आयएएस अधिकारी रुजू होण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. या पदावर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बदली झाली. मात्र, दीड महिना झाला तरी ते रुजू झाले नाहीत. त्यामुळे एमडी देता का, एमडी असे म्हणण्याची वेळ महाबीजवर आली आहे.

बियाणांचे उत्पादन, प्रक्रिया, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, विपणन व विक्री हे सर्व कार्य महाबीजमार्फत केले जाते. महाबीजचे मुख्यालय हे अकोल्यात असून, या महामंडळाची सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापकीय संचालकांची असते. या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. काही मोजके अधिकारी सोडता इतर अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहिले नाहीत. डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. ते १७ फेब्रुवारीला रुजू झाले; परंतु अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती झाली. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केली. तेही महिनाभरानंतर रुजू झाले. तीन महिन्यांतच रेखावार यांची बदली झाली. ३० जून रोजी रुचेश जयवंशी यांची या पदावर बदली झाली; परंतु ते रुजू झाले नाहीत. त्यामुळे या पदाचा प्रभार आता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडे आहे.

 

कोल्हापूरवरून ऑनलाइन कारभार

एमडीपदावर अद्यापही कोणी रुजू न झाल्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे प्रभार आहे. त्यामुळे त्यांच्यावर दोन पदांचा भार असून, ऑनलाइन कारभार हाकावा लागत आहे. पुढील रबी हंगाम पाहता या पदावर तत्काळ अधिकारी रुजू होणे गरजेचे आहे.

शासनाकडून दुर्लक्षित

नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नापसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, शासनाकडूनही हे महामंडळ दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे.

 

शेतकऱ्यांची संस्था म्हणून ओळख असलेल्या महाबीजमध्ये एमडीपदावर अधिकारी टिकूनच राहत नाही. शेतकऱ्यांसंदर्भातील विषय लक्षात घेऊन शासनाने याकडे लक्ष द्यावे.

- वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला

Web Title: Mahabeej's MD Post vaccant since one and half month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.