अकोला- पारंपरिक होळी आणि रंगोत्सवाचे चंगळवादामुळे विद्रूपीकरण होत आहे. ते थांबविण्यासाठी तरुणाईला सोबत घेऊन लोकमतने गुरुवारी होळीच्या दिवशी निर्जीव भिंत रंगवून त्यातून पारंपरिक व पर्यावरणपुरक होळी व रंगोत्सव साजरा करण्याचा बोलका संदेश तरुणाईपर्यंंंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. होळी आणि रंगपंचमीचे पारंपरिक महत्त्व आहे. रंगोत्सवाच्या आनंदात आबालवृद्ध सहभागी होतात. होळीला मोठी परंपरा असली तरी या सणाचे आता विद्रूपीकरण होत आहे. मद्य प्राशन करून केमिकलयुक्त रंगांचा वापर करीत पाण्याची मोठय़ाप्रमाणावर नासाडी करण्यातच आजची तरुणाई धन्यता मानत आहे. मद्य प्राशन करून रस्त्याने विचित्र आवाज काढत फिरणे, महिला आणि मुलींची छेड काढणे, गाड्यांचे जोरजोरात कर्कश हॉर्न वाजविण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. त्यामुळे रंगोत्सवाचे पारंपरिक महत्त्व कमी होऊन निव्वळ चंगळवादाला चालना देणारा उत्सव, असे स्वरूप रंगपंचमीला प्राप्त होत आहे. या सणाचे पारंपरिक महत्त्व आणि पर्यावरणाशी असलेले नाते जोपासण्यासाठी आणि दिशाहीन झालेल्या तरुणाईला या सणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोकमतने होळीच्या दिवशी आणि रंगपंचमीच्या पृष्ठभूमीवर शहरातील भिंत रंगवून त्यातून पारंपरिक रंगोत्सवाचा संदेश तरुणाईपर्यंंंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. सिव्हिल लाइन मार्गावरील सीताबाई कला महाविद्यालयाच्या आवार भिंतीवर लोकमतच्या पुढाकारातून शहरातील काही युवकांच्या मदतीने पर्यावरणपुरक आणि पारंपरिक होळीचे महत्त्व सांगणारे संदेश रंगविण्यात आले. लोकमतच्या या उपक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पारंपरिक रंगोत्सवाचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी ‘लोकमत’चा पुढाकार
By admin | Updated: March 6, 2015 02:03 IST