अकोला: मनपा प्रशासनाने शहरातील निर्माणाधिन बांधकामांचे मोजमाप केल्यानंतर ते अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. ही बांधकामे पाडण्याच्या मुद्यावर आयुक्तांनी ठाम राहणे गरजेचे असून, ती भुईसपाट करण्याचे पत्र महापौर ज्योत्स्ना गवई यांनी आयुक्त डॉ.कल्याणकर यांना दिले आहे. शहराच्या विविध भागात व्यापारी संकुलासह रहिवासी इमारतींचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी अशा बांधकामांची यादी तयार केली. यामध्ये १५२ इमारती उभारणार्या संबंधित बांधकाम व्यावसायिकांना प्रशासनाने बांधकाम बंद करण्याची नोटीस देऊन बांधकामाचे मोजमाप केले. यापैकी ११४ इमारतींचे बांधकाम नियमापेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. या मुद्यावर आयुक्तांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली. तूर्तास संबंधित इमारतींना नोटीस दिल्यानंतर काही इमारतींच्या नोटीसला एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. अशा इमारतींचे बांधकाम भुईसपाट करण्याची कारवाई आयुक्तांनी सुरू करण्याची मागणी महापौरांनी केली आहे.
**घुमजाव नको!
शहरात मंजूर एफएसआयपेक्षा जास्त बांधकाम होत आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक व शहर विद्रूप होत असल्याच्या मुद्यावरून प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे महापौर ज्योत्स्ना गवई यांनी स्वागत केले आहे. किमान या मुद्यावरून प्रशासनाने घुमजाव न करता, ठोस कारवाई अपेक्षित असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले.