कुष्ठरोग, क्षयरुग्ण शोध मोहिम : तीन दिवसांत २७ हजार नागरिकांची तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 10:56 AM2020-12-04T10:56:44+5:302020-12-04T11:00:28+5:30

Akola News जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.

Leprosy, Tuberculosis Search Campaign: Investigation of 27,000 citizens in three days! | कुष्ठरोग, क्षयरुग्ण शोध मोहिम : तीन दिवसांत २७ हजार नागरिकांची तपासणी!

कुष्ठरोग, क्षयरुग्ण शोध मोहिम : तीन दिवसांत २७ हजार नागरिकांची तपासणी!

Next
ठळक मुद्दे१ डिसेंबरपासून राज्यभरात कुष्ठरोग आणि क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली.मोहिमेंतर्गत कुष्ठरोगाचे ३६, तर क्षयरोगाचे १९ संदिग्ध रुग्ण आढळून आले.

अकोला: आरोग्य विभागांतर्गत १ डिसेंबरपासून जिल्ह्यात कुष्ठरोग आणि क्षयरुग्ण शोध मोहिमेस सुरुवात झाली असून, महापालिका कार्यक्षेत्रात गत तीन दिवसांत २७ हजार २५६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोहिमेंतर्गत कुष्ठरोगाचे ३६, तर क्षयरोगाचे १९ संदिग्ध रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून राज्यात कुष्ठरोग, क्षयरोग निवारण मोहीम थंडबस्त्यात पडली होती; मात्र १ डिसेंबरपासून राज्यभरात कुष्ठरोग आणि क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली. माेहिमेंतर्गत कुष्ठरोग, क्षयरोगग्रस्तांच्या सर्वेक्षणासोबतच कोविड रुग्णांचाही शोध घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. मागील तीन दिवसांत आराेग्य विभागाच्या पथकाने ६ हजार ३६ घरांना भेट दिली असून, २७ हजार २५६ नागरिकांची तपासणी केली. ही मोहीम १६ डिसेंबरपर्यंत चालणार असून, आरोग्य विभागाचे पथक घरोघरी भेटी देऊन नागरिकांची तपासणी करणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. सर्वेक्षणादरम्यान रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे आढळताच त्यांची तत्काळ चाचणी केली जाणार असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या लक्षणांकडे असणार विशेष लक्ष

शोध मोहिमेंतर्गत प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप, अंगावर पांढरे चट्टे या लक्षणांकडे प्रामुख्याने लक्ष असणार आहे. लक्षणे असल्यास गावातच रुग्णांच्या बेडक्यांचे संकलन करून त्याची तपासणी केली जाणार आहे.

 

मध्येच उपचार सोडणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन

क्षयरोगाचा उपचार मध्येच सोडून दिलेले चार रुग्ण सर्वेक्षणादरम्यान आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. गरजेनुसार काही रुग्णांना रुग्णालयातही दाखल करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुष्ठरोग, क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेला महापालिका क्षेत्रात सुरुवात करण्यात आली असून, काही संदिग्ध रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून, त्यांच्यावर पुढील उपचार केला जाणार नाही. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून योग्य माहिती द्यावी.

- डॉ. फारूख शेख, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा, अकोला.

Web Title: Leprosy, Tuberculosis Search Campaign: Investigation of 27,000 citizens in three days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.