कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फुप्फुस ठेवा निरोगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:55 AM2020-09-29T10:55:08+5:302020-09-29T10:55:55+5:30

निरोगी फुप्फुसासाठी नागरिकांनी योग्य व्यायाम करावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे.

Keep your lungs healthy to fight against corona! | कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फुप्फुस ठेवा निरोगी!

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फुप्फुस ठेवा निरोगी!

Next

- प्रवीण खेते
अकोला : कोरोना विषाणू प्रामुख्याने फुप्फुसांवर अटॅक करतो. त्यामुळेच शरीरातील आॅक्सिजनची पातळी खालावते अन् अनेकांना जीव गमवावा लागतो; पण वेळीच फुप्फुसाकडे लक्ष देऊन ते निरोगी ठेवल्यास कोरोनापासून असणारा धोका मोठ्या प्रमाणात कमी करणे शक्य आहे. त्यामुळे निरोगी फुप्फुसासाठी नागरिकांनी योग्य व्यायाम करावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या अन् मृत्यूदर हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत आहे; परंतु अशा परिस्थितीत घाबरण्यापेक्षा खबरदारी म्हणून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या फुप्फुसाची नीगा राखणे, तसेच फुप्फुसांची क्षमता वाढविण्याची गरज आहे. फुप्फुस हा आपल्या शरीरातील महत्त्वाचे अंग असून, वातावरणातून आॅक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायआॅक्साइड बाहेर सोडणे हे फुप्फुसाचे महत्त्वाचे कार्य आहे. या माध्यमातूनच आॅक्सिजन रक्ताद्वारे हृदयापर्यंत पोहोचतो; मात्र कोरोना विषाणू थेट याच फुप्फुसांवर अटॅक करत असल्याने न्युमोनिया होतो. परिणामी आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. रुग्णाला कृत्रिम आॅक्सिजन द्यावे लागते; मात्र फुप्फुसांची क्षमता कमी असल्याने त्याला एकाच वेळी शंभर टक्के आॅक्सिजन स्वीकारणे शक्य नसते. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. ही परिस्थिती आपल्यावर ओढवू नये म्हणून नागरिकांनी, विशेषत: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक व्यायाम करणे गरजेचे आहे.


कोरोनाचा दोन प्रकारे हल्ला
अप्पर रिस्पेरेक्टर
बहुतांश रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा हल्ला हा अप्पर रिस्पेरेक्टर म्हणजेच घशापर्यंतच झालेला असतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असतात. अशा रुग्णांच्या फुप्फुसापर्यंत कोरोना विषाणू पोहोचत नसल्याने त्यांना जास्त धोका नसतो.


लोअर रिस्पेरेक्टर
प्रामुख्याने ५० वर्षावरील व्यक्ती किंवा ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लोअर रिस्पेरेक्टर म्हणजेच फुप्फुसांपर्यंत झालेला असतो. त्यामुळे फुप्फुसाच्या ल्युकस लेअरला बाधा होऊन न्युमोनिया तयार होतो. न्युमोनियाचे प्रमाण वाढल्यास आॅक्सिजनची पातळी कमी होत जाते. ८० टक्के लोकांचा न्युमोनिया बरा होत असला, तरी फुप्फुसाची लवचीकता कमी होते. परिणामी आॅक्सिजन शोषण्याची क्षमता कमी होते.

कोरोनामुक्त झाल्यावर हे करा
 मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक
सायकलिंग
जोराने श्वास घेणे
काही सेकंद श्वास रोखून ठेवणे
छातीच्या मसल्सचे हलके व्यायाम
शक्य असल्यास धावणे
प्राणायाम करणे
खानपानावर द्या लक्ष

धूम्रपानासह अ‍ॅसिडिटीमुळे फुप्फुसातील म्युकस लेअर खराब होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे दम लागणे, कफ होणे, खोकला, अशा समस्या उद््भवतात. त्यामुळे धूम्रपान टाळलेलेच बरे. शिवाय आहारामध्ये अ‍ॅन्टी आॅक्सिडंट घटक असलेले भाजीपाला, फळांचे सेवन करावे.
 शरीरातील अवयव निरोगी असेल, तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो. कोरोना काळात तर हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने फुप्फुसाला निरोगी ठेवण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत त्यांना फुप्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी स्पायरोमॅट्री, पल्मोनरी रिहॅबीलेटेशन हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम केल्यास कोरोनामुळे झालेल्या क्षतीतून लवकर बरे होऊ शकतो.
 - डॉ. सागर थोटे, छाती रोग व फुप्फुस रोग तज्ज्ञ, अकोला

Web Title: Keep your lungs healthy to fight against corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.