टिळक मार्गाचे काम रेंगाळले : नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास
अकोला : शहरात सध्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही रस्त्यांची कामे पूर्ण होऊन शहराला एक वेगळाच ह्यलुकह्ण आला आहे. काही रस्त्यांची कामे मात्र रेंगाळलेली आहेत. शहरातील वर्दळीच्या टिळक मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, खोदून ठेवलेल्या या मार्गावरूनच अकोलेकरांचा प्रवास सुरू आहे. सिटी कोतवाली चौक ते शिवाजी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग सिमेंट काँक्रिटचा होणार आहे. सध्या सिटी कोतवाली चौक ते जुना कापड बाजारपर्यंतच्या टप्प्याचे काम गत दोन महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. दुभाजक असलेला हा मार्ग दोन्ही बाजूंनी सात ते आठ फूट खोल खोदण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये मुरूम, गिट्टी टाकून रस्त्याची दबाई करण्यात आली. सध्याच्या घडीला दोन्ही बाजू भरण्यात आल्या असल्या, तरी त्या अजूनपर्यंत पूर्णपणे भरण्यात आलेल्या नाहीत. वर्दळीचा रस्ता असल्याने या मार्गावरील वाहतूक वळती करणेही शक्य नाही. त्यामुळे या खोदून ठेवलेल्या रस्त्यांवरूनच वाहनांची ये-जा सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांसह या रस्त्यावरील व्याससायिकही कंटाळले आहेत. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, यासाठी युवासेनेकडून गत महिन्यात आंदोलनही करण्यात आले होते.
व्यावसायिक धुळीमुळे त्रस्त
शहरातील बाजारपेठ या रस्त्यावर एकवटलेली आहे. या रस्त्याने कापड, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, पुस्तकांची दुकाने व हॉटेल मोठय़ा प्रमाणात आहेत. खोदून ठेवलेल्या या मार्गावरील धूळ थेट दुकानांमध्ये येत असल्याने दुकानदार त्रस्त झाले आहेत. रस्ता खोदलेला असल्यामुळे ग्राहकही दुकानांकडे फिरकत नसल्याने दुकानदारांच्या व्यवसायांवरही परिणाम झाला आहे.
दुकानांमध्ये जाण्यासाठी करावी लागते कसरत
खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या कडेला विविध दुकाने आहेत. रस्ता खोदलेला असल्यामुळे या दुकानांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. दुपारच्या वेळेला टिळक मार्गावर मोठी गर्दी असते. त्यातच हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीची गती मंद झाली आहे. वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहनांच्या रांगा लागतात.