लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने बुधवार १८ रोजी मुख्यमंत्री उद््धव ठाकरे अकोला जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येईल. बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये बोरगाव मंजू, चोहोट्टा बाजार येथील ग्रामीण रुग्णालयांसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दाही अजेंड्यावर असणार आहे.जिल्ह्याच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न घेतले आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीसह बोरगाव मंजू आणि चोहोट्टा बाजार येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे; मात्र केंद्र सरकारकडून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद््घाटनासंदर्भात पत्र आले आहे. पद मंजूर नसताना डिसेंबरमध्येच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद््घाटन कसे करयाचे, असा पेच पडला आहे. त्यामुळे आढावा बैठकीत हा मुद्दादेखील अजेंड्यावर राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. प्राप्त माहितीनुसार, २२ मार्च २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा स्त्री रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांवरून ५०० करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार नवीन इमारतीच्या विंग अ व ब चे काम पूर्ण झाले आहे. या रुग्णालयात नवीन पदनिर्मिती व साधनसामग्रीबाबत निधी मागणीसाठी २७ डिसेंबर २०१८ रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला; मात्र अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही. दुसरीकडे एन.एच.एम. अंतर्गत विंग ‘ए’ साठी २५ जुलै २०१९ रोजी १४.३४ लाख निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होतो. त्यालाही मान्यता मिळाली नाही. तसेच बोरगाव मंजू येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी २६ सप्टेंबर २०१६ रोजी १४.७४ कोटींचे, तर चोहोट्टा बाजार येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोग्य सेवा संचालक, मुंबई यांच्याकडे अंदाजपत्रक सादर केले होते; मात्र या दोन्ही अंदाजपत्रकांना शासनस्तरावर मान्यता मिळाली नाही.
सुपर स्पेशालिटीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:20 IST