अकोला: महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने शहरात अवैध नळ जोडणी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत नळ जोडणी नियमित करून घेण्याचे आदेश मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिले आहेत. अवैध नळ शोधमोहिमेदरम्यान कर वसुलीची पावती, पाणीपट्टी वसुली पावती यांची मागणी मालमत्ताधारकांकडे करण्यात येणार आहे तसेच तपासणीसुद्धा करण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी संबंधित पावती न दाखविल्यास तसेच त्यांच्याकडे पाणीपट्टीसंबंधी पावती नसल्यास, त्यांच्याकडील नळ जोडणी अवैध असल्याचे गृहित धरून त्यांच्याकडून असलेल्या नळाच्या व्यासाच्या वार्षिक दराप्रमाणे(घरगुती/व्यावसायिक) नळ जोडणीनुसार पाणीपट्टी वसूल करण्यात येईल. त्यामुळे अवैध नळधारकांनी नळ जोडणी नियमित करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काही मालमत्ताधारक, व्यावसायिक मोटारपंपाद्वारे पाणी घेतात. त्यांच्या मोटारपंप महापालिकेकडून जप्त करण्यात येणार आहेत, असा इशाराही मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिला. नळधारकांनी नळ जोडणी वैध करण्यासाठी सुधारित शुल्काचा भरणा करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च आहे. ३१ मार्चनंतर अवैध नळ जोडणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
अवैध नळ जोडणी शोधमोहिमेस प्रारंभ
By admin | Updated: January 28, 2016 00:47 IST