कुरुम (जि. अकोला): महावितरणच्या साहित्याची चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांनी बुधवारी यश आले. पोलिसांनी टोळीकडून ८ लाख ५0 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात महावितरणचे साहित्य चोरणारी टोळी सक्रिय आहे. या टोळीने अनेक शेतकर्यांच्या साहित्यावरही हात साफ केले. दरम्यान,पोलिसांच्या विशेष पथकाला या टोळीची माहिती मिळाली. पथकाने टोळीला चिचखेड परिसरात जेरबंद केले. याप्रकरणी माना पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४११ (चोरीची मालमत्ता स्वीकारणे) व भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये राजबहादूर अनिस चौधरी (४६), अजमद खाँ बिसमिल्ला खाँ (३५), ऐजाज खाँ ऊर्फ राजा शेर खाँ (३0), नूर मोहम्मद शेख महबूब (३८), जमिरोद्दीन वाओद्दीन (४0) यांचा समावेश असून, हे सर्व माना येथील रहिवासी आहेत. आणखी गुन्हे येतील उजेडातपोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या ११ गुन्ह्यांपैकी सहा गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली. पोलीस आरोपींची कसून चौकशी करीत असून, तपासाअंती आणखी गुन्हे उजेडात येण्याची शक्यता आहे.
महावितरणचे साहित्य चोरणारी आंतरराज्यीय टोळी अकोल्यात गजाआड
By admin | Updated: January 28, 2016 21:00 IST