अकोला, दि. २२: आदर्श कॉलनी येथील मनपाच्या शाळा क्रमांक १६ वरील मैदानामध्ये जलवर्धन संस्थेने खोदलेल्या खड्डय़ात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खदान पोलिसांनी मनपा आयुक्तांसह, जलवर्धन संस्थेचे पदाधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. खदान पोलिसांनी जलवर्धन संस्थेच्या नोंदणीचे दस्तावेज तपासणी सुरू केले असून खड्डे खोदण्यासाठी कुणी परवानगी दिली, याचीही चौकशी खदान पोलिसांनी सुरू केली आहे. आदर्श कॉलनी परिसरातील मित्रनगरला लागून असलेल्या वसाहतमधील रहिवासी राजेश घनगावकर यांचा मुलगा सिद्धार्थ (७) आणि याच परिसरातील रहिवासी राकेश बहेल यांचा मुलगा कृष्णा (१0) हे दोघे मनपाच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर खेळत होते. या मैदानावर जलवर्धन या संस्थेने खोल चर खोदलेली होती. यामध्येच १0 फूट खोलीचे तीन शोषखड्डे खोदण्यात आले होते. या शोषखड्डय़ांचे बांधकाम पूर्ण न केल्याने खड्डय़ात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. कृष्णा आणि सिद्धार्थ हे दोघे येथे खेळत असतानाच ते शोषखड्डय़ात पडले. शोषखड्डय़ात गाळ असल्याने दोघेही या गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला. जलवर्धन संस्थेने बांधलेल्या या तीन शोषखड्डय़ांची कामे त्यांनी अर्धवट केल्यानेच दोन्ही बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. या शोषखड्डय़ात पाणी साचल्याने त्याला तारेचे कुंपण घेणे गरजेचे होते; मात्र जलवर्धन संस्थेने ना तारेचे कुंपण घेतले, ना या ठिकाणी धोका असल्याचे फलक लावले. त्यामुळे दोन बालकांचा बळी गेल्यानंतर या प्रकरणी खदान पोलिसांनी मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेच्या पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर या प्रकरणातील दोषींचा शोध घेणे पोलिसांनी सुरू केले असून सदरचे खड्डे कुणी खोदले, त्याला परवानगी होती काय, ती कुणाची परवानगी होती, जेसीबी कुणाचा होता यासह जलवर्धन संस्था ही नोंदणीकृत आहे काय, या सर्व प्रश्नांची उकल खदान पोलिसांकडून करण्यात येत आहे.
जलवर्धन संस्थेसह खड्डे खोदणा-यांची चौकशी
By admin | Updated: August 23, 2016 01:04 IST